मुरूड : प्रतिनिधी
शहरातील गणेश पाखाडीसमोरील प्रवासी निवारा शेडचे पत्रे तुटले असून, पाठीमागची भिंत कोसळली आहे. या शेडमधून पाणी गळत असल्याने पावसाळ्यात प्रवासी व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सदरची शेड नादुरुस्त असतानासुद्धा नगर परिषद त्याकडे लक्ष देत नसल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुरूड नगर परिषदेने उभारलेल्या या प्रवासी शेडच्या बाजूलाच सर एस. ए. हायस्कूल व अंजुमन इस्लाम हायस्कूल यासारख्या मोठ्या शाळा आहेत. शाळा सुटताच या निवारा शेडमध्ये नांदगाव मजगाव व उसरोली परिसरात जाणार्या विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते, मात्र ही शेड धोकादायक झाल्याने व पावसाळा असल्याने विद्यार्थ्यांना बाजूच्या काही दुकानांचा आसरा घ्यावा लागत आहे किंवा खूप दूर उभे राहून गाडीची वाट पाहावी लागते.
शहरातील गणेश पाखाडीसमोरील निवारा शेड मोडकळीस आली असून, तेथे नव्याने शेड उभारण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष निधीची तरतूदही करण्यात आली आहे. लवकरच या शेड उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
-स्नेहा पाटील, नगराध्यक्षा, मुरूड