Breaking News

सबुरीचे राजकारण हिताचे!

पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांच्या ताज्या मुलाखतीने तो देश लोकनियुक्त प्रतिनिधी नव्हे, तर सेनाधिकारी आणि त्यांनी घडविलेले वा स्वतंत्रपणे निर्माण झालेले आतंकवादी कसा चालवीत आहेत हे स्पष्टपणे दिसून येते आहे. ही एक स्पष्टोक्ती अशी आहे की ज्यामुळे भारताचे राजकारण अंतर्बाह्य ढवळून निघाले पाहिजे. काँग्रेस संस्कृतीने भारतावर प्रदीर्घ काळ राज्य केले आणि त्याची धोरणे पाकिस्तान केंद्रित होती. भाजपचे नरेंद्र मोदी ह्यांचे सरकार ती भारत केंद्रित करू पाहत आहे. त्यासाठी केवळ भारताचे हित समोर ठेवून प्रामुख्याने गृह, सरंक्षण आणि विदेश मंत्रालयाची उद्दिष्टे आणि धोरणे आरपार बदलावी लागतील. तसे करू दिले तर भारतीयांची मानसिकता सकारात्मक आणि विजिगीषु होण्याची प्रक्रिया वेग घेईल. कुंठित ऊर्जा मोकळी होऊन ती विकासाचे कामी एकवटता येईल. काँग्रेस संस्कृतीने सहकार्याचा हात पुढे केला, तर फाळणीचे त्यांचे अक्षम्य पाप फिकट व्हायला सुरुवात होईल. पापक्षालनाची प्रक्रिया इतक्या उशिरा का होईना सुरू होईल, पण तशी शक्यता कमी दिसते. कारण भारताची सार्वभौमता, अखंडता, स्वतंत्रता आणि एकात्मता यांच्या आड येणार्‍या पाकिस्तानी कृत्याचा बीमोड करण्यासाठी भारताने कठोर कारवाई केली, तर त्यामुळे भारतातील मुसलमानांचा विश्वास गमावल्यासारखे होईल, अशी टोचणी काँग्रेस संस्कृतीला सतत लागलेली असते. पाकिस्तान आणि भारतातले मुसलमान हे दोन विषय एकमेकाला जोडलेले नसून ते स्वतंत्र आहेत असे काँग्रेस संस्कृती मानत नाही. हा भारतातील मुसलमानांच्या नागरिकत्वाचा आणि भारतनिष्ठेचा अपमान आहे. तो त्यांनी सहन करता कामा नये. त्यांनी उठाव केला पाहिजे आणि सरकारच्या पाकिस्तानविरोधी कारवायांना आमचा निःसंदिग्ध पाठिंबा आहे असे घोषित केले पाहिजे. त्यामुळे मने साफ होतील आणि एकात्मता निर्धोक होईल.

त्यादृष्टीने महाराष्ट्रातील काँग्रेस संस्कृती आणि येथे राहणारे विविध भाषिक विचारवंत ह्यांच्यात अपेक्षित परिवर्तन होईल का? आजवरचा अनुभव पाहता तशी आशा करणे चूक ठरेल. पक्षीय राजकारण आणि राष्ट्रीय राजकारण असे दोन प्रकार असतात. काँग्रेस संस्कृतीने पाकिस्तान निर्मितीला साह्य केल्यामुळे त्यांचे राष्ट्रीय राजकारणही पाकिस्तान केंद्रित झाले आणि त्याला सुसंगत असे देशांतर्गत पक्षीय राजकारण ते बेतत आले. महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवामुळे काँग्रेसला स्वार्थासाठीसुद्धा  शिकण्यासारखे बरेच आहे. निवडणूक काळात काँग्रेसने प्रचाराची नीच पातळी गाठली. लोकांना ते आवडले नाही. राहुल गांधींसारखा व्यसनाधीन आणि विदेशी वास्तव्यात रममाण होणारा उच्शृंखल तरुण आपण पहिल्या पंतप्रधानांचे पणतू आहोत ह्या एकाच अधिकाराने नरेंद्र मोदींसारख्या तपस्वी आणि उपभोगशून्य नेत्याविरुद्ध उठसूठ गालिप्रदान करतो हे सर्वसामान्य माणसाच्या सहनशक्तीच्या पलीकडचे होते. त्यादृष्टीने काँग्रेसचा चुकांचा अभ्यास चालू आहे की नाही कळत नाही. तेव्हा भाजप पुन्हा सत्तारूढ होऊ नये म्हणून काँग्रेस संस्कृती आणि विचारवंत काय कारवाया करतील ह्याची अटकळ बांधता येते. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस ह्यांचे हिंदुत्वाचे राजकारण मुसलमान आणि दलित ह्या दोन समाजाच्या सुरक्षिततेच्या आणि अंतिम हिताच्या विरोधी जाणारे आहे हे सातत्याने आणि जोरजोरात सांगत राहण्यावर विचारवंतांचा भर राहील. भाजप आणि शिवसेना ह्यांच्यात भावी मुख्यमंत्री कोण या मुद्द्यावरून कडाक्याचे भांडण लागू शकते का याची चाचपणी काँग्रेस संस्कृती करीत आहे.

सध्या देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे ही दोन नावे निवडणुकीनंतरचे मुख्यमंत्री म्हणून लोकांसमोर ठेवण्यात आली आहेत. प्रत्येकाला स्वप्न पाहण्याचे स्वातंत्र्य असते, पण त्या स्वप्नांवर स्वार व्हायचे असेल तर भक्कम मांड ठोकण्यासाठी मांड्यांचे स्नायू बळकट असावे लागतात आणि छातीमध्ये दुर्दम्य आत्मविश्वास भरलेला असावा लागतो. इंदिरा गांधींनी योग्यता नसतानाही काहींना मुख्यमंत्री म्हणून नेमले आणि महाराष्ट्राला ते भोगावे लागले, पण तेव्हा काँग्रेस पक्षाची एकमुखी सत्ता महाराष्ट्रात आणि देशात होती आणि त्यामुळे पक्षीय सोयीगैरसोयींनुसार शासकीय आणि राजकीय निर्णय इंदिराजींना वाकविता येत असत. शिवसेनेची एकमुखी सत्ता अजून अस्तित्वात आलेली नाही. मुख्य मुद्दा हा आहे की ज्याला मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा आहे त्याला आपले नाव कोण पुरस्कृत करीत आहे हे बारकाईने बघावे लागते. ज्यांची विश्वासार्हता पूर्णपणे रसातळाला गेलेली आहे अशी माणसे आपले नाव पुढे करीत असतील, तर कोणाची तरी सुपारी म्हणून आपल्याला पुढे ढकलले जात आहे का अशी शंका मनात येणे चुकीचे ठरणार नसते. कारण एकदा सुपारी म्हणून शिक्का बसला की तो पुसणे अवघड होते. सुपारी नेत्याला लोक ओळखून असतात. त्याच्या प्रत्येक वक्तव्यामागे किती पाकिटे घरी पोचती झाली ह्याचा हिशेब करणे मनोरंजनात्मक खेळ होतो. जे अगदीच लाचार आहेत असे लोक सोडून बाकीचे थोडेफार स्वतंत्र अस्तित्व असलेले पक्षाचे समन्वयस्क आणि ज्येष्ठ कार्यकर्ते सुपारी नेत्यांपासून दूर राहणे पसंत करतात.

फडणवीस महाराष्ट्राचे सतरावे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या आधीचे  काही अल्पकाळ त्या खुर्चीत होते. दिल्लीला जोराची कळ आली म्हणून त्या वेळेला त्यांना त्या जागेवर बसावे लागले होते. ते भ्रष्टाचारी होते आणि थोडेही थांबायला तयार नव्हते किंवा त्यांचे अचानक निधन झाले होते. आपल्यामागे ‘माजी मुख्यमंत्री’ हे बिरूद लागले ह्यातच त्यांना समाधान होते. काही कर्तबगार होते, पण त्यांना दिल्लीचा कटाक्ष आणि पक्षाचे हानीलाभ पाहून सगळे राजकारण करावे लागले. त्यामुळे लोकांच्या हृदयावर त्यांना आपली नाममुद्रा हवी तशी उमटविता आली नाही. राजकारणात असे म्हटले जाते की प्रत्येक नेत्याला स्वकर्तृत्वविषयात आपण पहिले बाजीराव आहोत असेच सुरुवातीला वाटत असते. इतके मोह असतात की त्याचा दुसरा बाजीराव कधी होतो हे त्यालाच कळत नाही. दिल्लीच्या बादशहाची दाढी जाळून आल्यानंतर मस्तानीच्या महालात शिरून अष्टगुणी विडा खाण्याचे स्वातंत्र्य पहिल्या बाजीरावाला होते. दुसरा बाजीराव बावनखणीत जन्मभर विडेच चघळत बसला. त्यामुळे त्याला इंग्रजांच्या हाती राज्य सोपवावे लागले. पक्षश्रेष्ठी, उद्योगपती आणि व्यापारी जगत यांच्याकडूनही सुगंधित आणि मसालेदार विड्यांचा अखंड पुरवठा होतच असतो. ह्या मोहपाशांना पुरून उरतो तो मुख्यमंत्री आदरपूर्वक लक्षात राहतो.

अपरिहार्य असे पक्षीय राजकारण केलेच, पण आपण लोकांची सेवा करण्यासाठी त्या दुर्लभ स्थानावर विराजमान आहोत याचे भान ज्यांना होते आणि त्याप्रमाणे ज्यांनी हालचाल केली, नवा विचार दिला, परिस्थिती पालटविण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले आणि यशस्वी झाले असे माझ्या मते तीन मुख्यमंत्री होऊन गेले आणि ते म्हणजे यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस. यशवंतराव आजपर्यंत आदर्श राहिले. लोकांची मने सांधण्याचे फार मोठे आव्हान त्याच्यासमोर होते ते त्यांनी समर्थपणे पेलले. महाराष्ट्राची अस्मिता राखली. दिल्लीचे कळसूत्री बाहुले होऊ दिले नाही. प्रशासनाच्या आणि लोक संघटनांच्या ज्या परंपरा त्यांनी घालून दिल्या त्या पुढच्यांकडून नीट पाळल्या गेल्या नाहीत म्हणून महाराष्ट्र विकासात अपेक्षित उंची गाठू शकला नाही. वसंतदादा पाटील ह्यांची प्रशासनावर उत्तम पकड होती आणि त्यांना लोकसेवेची प्रामाणिक तळमळ होती, पण दुर्दैवाने त्यांना सर्वाधिक पक्षांतर्गत विरोध होत राहील ह्याची व्यवस्था दिल्लीकडून होत राहिली. कौटुंबिक कलह होतेच. त्यात त्यांची शक्ती वाया गेली. फडणवीस लोकोत्तर अशासाठी कारण त्यांनी महाराष्ट्राच्या रूढ राजकीय संकल्पना बदलून टाकल्या. जातीपातीचे राजकारण न करता ज्याने विकासाच्या कामातून लोकविश्वास संपादित करता येतो हे दाखवून दिले. असा हा पहिला मुख्यमंत्री. सत्तेच्या भागीदारीतील लाभाचे प्रमाणशीर वाटप करण्याच्या तत्त्वावर नोकरशाही आधीच्या प्रस्थापित राजकारण्यांना बांधलेली होती. तिला फडणवीसांनी कर्तव्याची जाणीव कठोरपणे करून देऊन कामाला लावले आणि वर्षानुवर्षे बासनात धूळ खात पडलेल्या विकास योजना मार्गी लावल्या. लोकांचा सरकारी कारभारावरचा उडालेला विश्वास पुन्हा प्रतिष्ठापित केला ही लोकशाहीच्या दृष्टीने फार मोठी उपलब्धी त्यांच्या नावावर जमा आहे. पाच वर्षे ते सतत कार्यमग्न राहिले आणि बोट दाखवावे असे त्याचे विषयात विपरीत काही घडले नाही हे निष्कलंकत्व लोकांना भावले. पाणी, शेती, उद्योग, रस्ते वाहतूक, शिक्षण, मराठी भाषा अशा अनेकविध जिव्हाळ्याच्या विषयाच्या संकल्पचित्रात ज्याने समग्र महाराष्ट्र मानस व्यग्र ठेवले आणि पूर्ततेसाठी सहकार्य मिळविले असा हा पहिला मुख्यमंत्री. तो काँग्रेस संस्कृतीच्या परिघाबाहेरचा असूनही त्याने लोकांचा विश्वास आपल्या उत्तम चारित्र्यावर संपादून महाराष्ट्र विकासोन्मुख ठेवला. हे यश प्रस्थापित राजकीय संकल्पना क्रांतिकारकरीत्या बदलवून टाकणारे आहे.तेव्हा नवा मुख्यमंत्री कोण ह्याची चर्चा न करता भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य हे मानांकन मिळावे म्हणून सर्वांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्यास पुढे यावे हे शहाणपणाचे ठरणार आहे. सूज्ञास अधिक काय सांगावे?

-अरविंद विठ्ठल कुळकर्णी (मो. क्र. 9619436244)

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply