खोपोली ः बातमीदार
कोरोना थोपवण्यासाठी डॉक्टरांच्या मदतीने पोलीस खातेही मोलाची भूमिका व कर्तव्य बजावित आहेत. आयएसओ प्रमाणपत्रधारक असा नावलौकिक असलेल्या खालापूर पोलीस ठाण्याची सध्या लौकिकास साजेशी कामगिरी होत आहे. लाठीचा वापर न करता लॉकडाऊनचे महत्त्व नागरिकांच्या मनावर बिंबविण्यात पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी यश मिळविले आहे. तसेच त्यांनी ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
खालापूरची लोकसंख्या 2,11,790 एवढी आहे. याशिवाय परप्रांतातून आलेल्या नोंद नसलेल्यांची संख्या 50 हजारांच्या घरात आहे. खोपोली, रसायनी आणि खालापूर पोलीस ठाणे असून चौक आणि वावोशी दूरक्षेत्र आहे. या सर्व ठिकाणी मिळून केवळ 210च्या आसपास पोलीस आहेत. एवढ्या प्रचंड लोकसंख्येचा भार असतानाही खालापूर तालुक्यात लॉकडाऊनदरम्यान पोलीस अहोरात्र कायदा-सुव्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. अपुर्या कर्मचारीसंख्येचा प्रश्न सर्वच पोलीस ठाण्यांत भेडसावत असून नेहमी गुन्हेगारांशी दोन हात करणारे हात सध्या कोरोनाविरोधातील
लढाईत गुंतले आहेत.
लॉकडाऊनचा गैरफायदा घेत ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार घडत असून नागरिकांनी सजग राहणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत ओटीपी कुणालाही देऊ नये, असे आवाहन समाजमाध्यमांतून करण्यात आले आहे. तसेच घर सोडू नका, या नियमाचे पालन हेच पुढील निरोगी जीवन आहे हे नागरिकांनी समजून घ्यायला हवे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शासनाच्या आदेशाचे पालन करून प्रत्येकाने घरीच राहावे.
-विश्वजीत काईंगडे, पोलीस निरीक्षक, खालापूर