मुरूडमधील नियोजन ढासळले; पाणी जपून वापरण्याचे आवाहन
मुरूड ः प्रतिनिधी
मुरूडमधील बहुसंख्य लोक कामानिमित्त मुंबई, ठाणे, दहिसर, भांडूप, बोरिवली, कल्याण, विरार व पनवेल परिसरात आहेत, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉकडाऊनमुळे लोकांना काम मिळेनासे झाले आहे. त्यामुळे घरी बसून दिवस काढण्यापेक्षा लोकांनी आपल्या मूळ गावी येणे पसंत केले. रेल्वे व एसटी बंद असतानाही लोकांनी 150 किमीचे अंतर पायी कापून गाव गाठले आहे. शहरातील लोक ग्रामीण भागात आल्याने सर्वच ग्रामपंचायतींना पाणी नियोजनाची कसरत करावी लागत आहे. अचानक गावांतील लोकसंख्या 13 ते 15 टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे पाण्याचे नियोजन मात्र ढासळले आहे. पूर्वीपेक्षा जास्त पाण्याचा वापर वाढला आहे. त्यातच एप्रिल-मेसारखे कडक उन्हाचे दिवस आल्याने पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. पिण्याचा पाण्याचा अचानक वापर वाढल्याने या तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी दिवसाला तीन तासच पाणी देण्याचे नियोजन केले आहे. त्याचप्रमाणे नोटीस बोर्ड व गावात दवंडी देऊन पिण्याचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पिण्याचे पाणी कपडे धुण्यास वापरू नये, असे फलकही लावण्यात आले आहेत. विशिष्ट सणासाठी येणारे लोक कोरोनामुळे आधीच गावी आले, परंतु त्यांना आता पाणीसंकटाला तोंड द्यावे लागत आहे.
जल नियोजनासाठी ग्रामपंचायतींची कसरत
एकंदर गावातील लोकसंख्या वाढल्याने पाणी नियोजन करणे ग्रामपंचायतींना क्रमप्राप्त ठरत आहे. कोरोनामुळे शहर सोडून ग्रामीण भागात आलेल्या नागरिकांना पाणी नियोजनाचा सामना करावा लागत आहे. सध्या ज्या धरणांतून पाणीपुरवठा होतो, ती धरणे सुकत आली असून लवकरच तळ गाठणार आहेत. अशा परिस्थितीत वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवण्यासाठी ग्रामपंचायतींना मोठी कसरत करावी लागत आहे.