उरण : रामप्रहर वृत्त
कोरोनामुळे लागू टाळेबंदीत डोक्याचे, दाढीचे केस वाढल्यावरून सुरू झालेले विनोद करमणुकीचा विषय ठरत असले, तरी केशकर्तनाचे काम करणारे सलून, पार्लर, केशकर्तनालये येथे काम करणार्या कारागिरांच्या वेदनेची किनार हा विषय गंभीर बनू लागला आहे. गेल्या महिनाभरापासून ही सर्व दुकाने बंद असल्याने तेथे काम करणार्या कर्मचार्यांचे उदरनिर्वाहाचे साधनच बंद झाले आहे. दुसरीकडे दुकानांचे भाडे किंवा कारागिरांचे पगार थकू लागल्याने ही साखळीच सध्या धोक्यात आली आहे. पूर्वी किमान दाढी घरातल्या घरात करण्याची सुविधा असायची. मात्र, गेल्या काही वर्षांत आकर्षक दाढी किंवा केस राखण्याकडे कल वाढल्याने सलूनचा व्यवसायही तेजीत आला होता. अनेकांनी मोठमोठे गाळे भाड्याने घेऊन तेथे सलून सुरू केले. या सलूनमध्ये काम करणार्या कारागिरांना दररोजच्या कमाईतील ठराविक हिस्सा रोजच्या रोज किंवा आठवड्याने दिला जातो. मात्र, गेल्या महिनाभरापासून हा व्यवसाय बंद असल्याने या कारागिरांची कमाईच पूर्णपणे थांबली आहे. महिनाभर केशकर्तनालये बंद असल्याने सर्वसामान्यांचीही अडचण होऊ लागली आहे. अनेकांना वाढलेल्या केस-दाढीनिशी घरात वावरावे लागत आहे. यावरून सध्या समाजमाध्यमांवर विनोदही प्रसारित होत आहेत. अनेकांनी घरातल्या घरात दाढी करण्यास सुरुवात केली आहे, तर काहींनी घरात उपलब्ध साधनांनिशी स्वत:चे केस कापून घेतल्याचे व्हिडीओही सध्या समाजमाध्यमांत चर्चेचा विषय आहेत. ब्युटी पार्लर बंद असल्याने महिलावर्गातही नाराजी आहे.