उरण : प्रतिनिधी
उरण शहरात कोटनाका येथील आनंदी हॉटेल, काळा धोंडा, राघोबा मंदिर, लिखिते बिल्डिंग व बुरुड आळीपर्यंतचा परिसरातील कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित केल्यानंतर सील केल्याने कोटनाकामार्गावरून वाहनांना बंदी केल्याने सर्वच चारचाकी व दुचाकी वाहने उरण चारफाटा येथून शहरात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे उरण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व उरण वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी यांनी संयुक्तपणे चारचाकी व दुचाकी अशा 100हुन अधिक वाहनांवर ऑनलाइन दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरात येणार्या चारचाकी व दुचाकी वाहनांवर उरण चारफाटा, बोकडविरा येथील सेवा चारफाटा व मोरा रोडवरील वैष्णवी हॉटेल, पेन्शनपार्क या तीन ठिकाणी नाकेबंदी करण्यात येऊन, सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत ही कारवाई करण्यात आली. उरण शहरात दैनंदिन गरजेची विविध कारणे पुढे करीत अनेक वाहने शहरात फिरत आहेत. 14 एप्रिलपर्यंतच्या पंतप्रधानांनी केलेल्या लॉकडाऊननंतरही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव थांबत नसल्याने हे लॉकडाऊन पुन्हा 3 मेपर्यंत वाढविण्यात आले आहे. लॉकडाऊन जारी केलेले असतांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक फैलावू शकतो, याचे गांभीर्य लक्षात न घेता येथील नागरिकांना दैनंदिन गरजा अधिक महत्त्वाच्या वाटत आहेत.
शहरात येणार्या वाहनांमध्ये घट
उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी व उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, हवालदार व इतर पोलीस कर्मचारी यांच्यासह उरण वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी यांनी संयुक्तपणे गुरुवारी वाहनांवरील करण्यात आलेल्या कारवाईत चारचाकी व दुचाकी अशा 100 हुन अधिक वाहनांवर ऑनलाइन दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे अशा वाहनचालकांवर चाप लावल्याने उरण शहरात येणार्या वाहनांमध्ये घट झाल्याचे पाहावयास मिळाले.