जेएनपीटीच्या राखीव जंगलात उपाययोजना करण्याची मागणी
उरण : प्रतिनिधी – सुमारे दोनशे हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या राखीव जंगल डोंगर परिसरात दुर्मिळ वन्यप्राणी भटकंती व रस्ते क्रॉसिंग करताना भरधाव वेगाने धावणार्या वाहनाखाली येऊन हकनाक बळी जात आहेत. अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे वाहनाखाली येऊन नाहक बळी जाणार्या दुर्मिळ वन्यप्राण्यांची संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
जेएनपीटी बंदर सुमारे 3500 हेक्टर क्षेत्रावर पसरलेले आहे. यापैकी 1200 हेक्टर क्षेत्र कांदळवन आणि हरितपट्टयासाठी आरक्षित आहे. तर इको पार्कसाठी 160 क्षेत्र आरक्षित ठेवण्यात आले आहे. जेएनपीटी प्रशासन भवनाला लागुनच असलेल्या सुमारे 150 ते 200 हेक्टर क्षेत्रावर राखीव जंगल आहे. जेएनपीटी बंदर उभारण्यात येण्यापुर्वीपासूनच हे जंगल अस्तित्वात आहे. तसेच जेएनपीटी बंदर अस्तित्वात येण्यापूर्वी या जंगलाच्या सिमेला लागूनच शेवा आणि हनुमान कोळीवाडा ही दोन गावे अस्तित्वात होती. जेएनपीटी बंदर उभारणीसाठी ही दोन्ही गावे विस्थापित करण्यात आली आहेत. त्यानंतर बंदरासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींचा ताबा आपसूकच जेएनपीटीकडे आला आहे.त्यामुळे वनखात्याच्या अखत्यारीतील राखीव जंगलही जेएनपीटीच्या मालकीचे झाले आहे. या जंगलातच नौदलाच्या एअरफोर्सचा तळही पुर्वीपासुनच कार्यरत आहे.
1980 च्या दशकात उभारण्यात आलेले जेएनपीटी बंदर आता मे महिन्यात 32 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. मागील 32 वर्षात जेएनपीटीच्या मालकीचे आणि अखत्यारीतील हे जंगल अफाट वाढलेल्या फोफावलेल्या विविध झाडे झुडपे, वृक्षवेलीने चांगलेच बहरलेय. घनदाट बनलेल्या या राखीव जंगलात मोर, लांडोर,तरस व इतर स्थलांतरित विविध आकर्षक जातीच्या पक्षांच्या वास्तव्यांमुळे आणि किलबिलाटाने गजबजले आहे. जेएनपीटीच्या मालकीच्या याच राखीव जंगलात पक्षांबरोबरच दुर्मिळ जातीचे कोल्हे, भेकरं, तरस, ससे, माकडे, रानडुक्कर, रानमांजर आदी वन्यप्राणीही बर्यापैकी संख्येने वास्तव्य करून आहेत. जेएनपीटीच्या राखीव जंगलातील दुर्मिळ कोल्हे, भेकर असे वन्यप्राणी भक्ष्याच्या शोधार्थ अनेक वेळा रात्रीच्यावेळी दरम्यान जंगलाबाहेर पडतात.
या जंगलाच्या सभोवार बंदरातून आयात-निर्यात होणार्या कंटेनर मालाची वाहतूक करण्यासाठी सहा पदरी रस्ते आहेत.या सहा ते आठ पदरी रस्त्यावरून अहोरात्र कंटेनर मालाची वाहतूक होत असते. या सहा ते आठ पदरी रस्त्यांच्या बाजूलाच विस्तिर्ण परिसरात कांदळवन, समुद्र, खाड्या पसरलेल्या आहेत. या कांदळवन, समुद्र, खाड्यात कोल्हे, तरस, भेकरं यांच्या आवडीचे खेकडे, मासे इतर खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. अशा खाद्याच्या शोधार्थ रात्रीअपरात्री अंधारात हे वन्यप्राणी जंगलासभोवार असलेल्या रस्त्यांवरून निघतात. रस्ताक्रॉस करण्याच्या नादात अवजड वाहनांखाली येऊन मृत्यूमुखी पडतात.जेएनपीटी परिसरातील विविध रस्त्यांवर अशा वारंवार घडलेल्या घटनांमध्ये काही दुर्मिळ वन्यप्राणी मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे दुर्मिळ प्राण्यांची जीवितहानी टाळण्यासाठी काही उपाययोजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे.
जेएनपीटीच्या राखीव जंगलातील अशा प्रकारे अपघातात नाहक मृत्युमुखी पडणार्या वन्यप्राण्यांची माहिती अद्याप आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही, याबाबत जेएनपीटीने कळविल्यास वनविभागाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल.
-शशांक कदम, वनसंरक्षक, उरण
उपाययोजनांबाबत गांभीर्याने विचार -व्ही. जी. घरत
जेएनपीटीच्या राखीव जंगलातील अशा प्रकारे अपघातात नाहक मृत्यूमुखी पडणार्या वन्यप्राण्यांना वाचवण्यासाठी काय उपाययोजना करता येईल का याबाबत जेएनपीटी गांभीर्याने विचार करीत असल्याचे प्रोजेक्ट, प्लॉनिंग ऍण्ड डेव्हलपमेंट विभागाचे व्यवस्थापक व्ही. जी. घरत यांनी सांगितले. वनविभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधुन याबाबत चर्चा करण्याची तयारीही जेएनपीटीने दाखविली आहे. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वनविभागाने प्रस्ताव दिल्यास जेएनपीटी त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी माहितीही घरत यांनी दिली.