Breaking News

नागोठणेत दुकानदारांकडून नियमांची पायमल्ली; दंडात्मक कारवाईचे संकेत

नागोठणे ः प्रतिनिधी

दर रविवारी दुकाने उघडी ठेवण्यावर येथील ग्रामपंचायतीकडून पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत, मात्र काही दुकानदार हेतुपुरस्सर दुकाने उघडी ठेवून मालविक्री करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. ग्रामपंचायतीकडून या दुकानदारांना धडा शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुप्तपणे पाहणी करून बंदी असतानाही रविवारीसुद्धा उघडलेल्या दुकानांची यादी तयार करून सोमवारी या नऊ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी सांगितले.

 ग्रामपंचायतीच्या निर्देशानुसार सोमवारपासून सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यात येणार आहेत. काही दुकानदार नियमांचे काटेकोरपणे पालन करीत असले तरी शहरातील काही दुकानदार नियमांकडे दुर्लक्ष करीत सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवून

मालविक्री करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. शिवाजी चौकालगत असणार्‍या मिठाई तसेच फरसाण विक्री करणार्‍या दोन-तीन दुकानांनी दूधविक्रीच्या नावाखाली दुधापेक्षा इतर पदार्थांची विक्री करण्याचा प्रयत्न केल्याने सोशल डिस्टन्सचे नियम पायदळी तुडविल्याचे दिसून येत आहे. हातगाडी किंवा टपरीत हा छोटा व्यवसाय करण्यावर निर्बंध असले तरी येथील एका भल्यामोठ्या मिठाईच्या दुकानाने तर या पदार्थांबरोबर वडापावसारखे ताजे पदार्थ विक्री करण्यात सुरुवात केल्याचे स्पष्ट होत आहे. शहरातील बहुतांश दुकानदार येथील व्यापारी संघटनेचे सदस्य आहेत. संघटनेच्या नियमांचे काही जण पालन करीत असले तरी काही जण डोळेझाक करीत असल्याने याबाबत संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जैन यांना विचारले असता शासन तसेच नागोठणे ग्रामपंचायतीच्या नियमांचे पालन करण्याचा संघटनेतील अनेक जण प्रयत्न करीत असले तरी काही सदस्यांनी कितीही खाऊन त्यांचे पोट भरतच नसल्याने त्यांना दुकाने उघडी ठेवावी लागतात, असे मार्मिक उत्तर त्यांनी या वेळी दिले. ग्रामपंचायतीने रविवारी उघड्या असणार्‍या दुकानांवर सोमवारी दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे. यातील एखादा आमच्या संघटनेचा सभासद असला तरी संघटना त्या विषयात लुडबूड करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply