माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची राज्य शासनाकडे मागणी
मुरूड : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने नारळ, सुपारी बगायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याचा बागायतदार 15 वर्षे मागे गेला आहे. ते लक्षात घेऊन राज्य शासनाने बागायतदारांना भरीव मदत दिली पाहिजे ही भाजपची आग्रही भूमिका आहे, अशी मागणी रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आमदार रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि. 8) येथे केली.
चक्रीवादळात नुकसान झालेल्या मुरूड तालुक्याचा माजी पालकमंत्री व आमदार रवींद्र चव्हाण यांनी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते व पदाधिकारी यांच्यासमवेत दौरा केला. या वेळी त्यांनी काशीद, सर्वे, नांदगाव, मुरूड आदी ठिकाणी भेटी देऊन नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर तहसील कार्यालयात बैठक घेऊन नागरिकांच्या समस्याही भाजप नेत्यांनी जाणून घेतल्या.
आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले की, शंभर कोटी हा निधी तुटपुंजी असून, यातून काही साध्य होणार नाही. राज्य शासनाने नुकसानग्रस्तांना मोठा निधी देणे गरजेचे आहे. चौपदरी रस्ता तयार करताना वृक्षतोडीनंतर जो भाव शेतकर्यांना दिला गेला तोच भाव वृक्ष उन्मळून पडलेल्या बागायतदारांना मिळायला हवा. वादळात सापडलेल्या शेतकर्यांसाठी किमान सात वर्षांचा कृती आराखडा तयार करून सातत्यपूर्ण मदत देण्यात यावी. बागायतदारांना रोपे आणि खतदेखील शासनामार्फत मोफत दिले गेले पाहिजे. त्याचप्रमाणे नुकसानीचे पंचनामे वास्तववादी असावेत. त्याकरिता अधिकार्यांचे वेळापत्रक बनवावे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नांदगाव शाखेबद्दल लोकांच्या तक्रारी आहेत. ग्राहकाला व्यवस्थित सेवा मिळाली पाहिजे. बँकेचा कारभार सुधारा, असे आमदार चव्हाण यांनी सूचित केले. या वेळी उपस्थित नागरिकांनी सिमेंटचे पत्रे चढ्या भावाने विक्री होत असल्याची तक्रार केली. त्यावर त्यांनी संबंधित दुकानदारावर पोलीस केस करा, असे सांगितले.
आमच्या अंदाजाप्रमाणे वादळ झालेल्या तालुक्यांतून सुमारे अडीच लाख सुपारीची झाडे कोलमडून पडली आहेत. हे बागायतदारांचे मोठे नुकसान आहे. अशा बागायतदारांना भरीव मदत मिळाली पाहिजे यासाठी भाजप भूमिका बजावणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.
फिरता जनरेटर उपलब्ध करा : आमदार प्रशांत ठाकूर
चक्रीवादळ झाल्यापासून मुरूड तालुका अंधारात आहे. वीजपुरवठ्याअभावी लोकांना पाणीपुरवठा करतानाही खूप अडचणी येत आहेत. तेव्हा तहसीलदार यांनी जनतेला फिरता जनरेटर उपलब्ध करून देऊन लोकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी केली.
भाजपकडून चक्रीवादळग्रस्तांना सौर दिवे, पत्र्यांचे होणार वाटप
चक्रीवादळामुळे ज्या तालुक्यांत प्रचंड नुकसान झाले आहे तेथे साडेपाच हजार सौर दिवे तसेच ज्यांच्या घराचे छप्पर उडाले आहे त्यांना सिमेंट अथवा लोखंडी पत्रे यांचे मोफत वाटप भाजपच्या माध्यमातून लवकरच करणार आहोत. काही भागात आमचे मदतकार्य सुरूदेखील झालेले आहे, असे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. वादळात सापडलेल्या सामान्य नागरिकाला भाजप सन्मानाने उभे करणार आहे, असेही ते म्हणाले.
या बैठकीला भाजप दक्षिण रायगड सरचिटणीस मिलिंद पाटील, मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, बाळा भगत, उमेश माळी, महेश मानकर, शैलेश काते, प्रवीण बैकर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह असंख्य वादळग्रस्त नागरिक उपस्थित होते.