Breaking News

बोनस शेअर, लाभांश आणि शेअर विभाजन

शेअर बाजारातील कंपन्या जाहीर करत असलेल्या बोनस शेअर्स, लाभांश आणि शेअर विभाजनाविषयी अनेक समज गैरसमज आहेत. या तिन्हीतील फरक आपण समजून घेऊयात.

आपण सर्वच जाणतो की पारंपरिक गुंतवणुकीच्या माध्यमात व्याज हेच एक परताव्याचा मार्ग असतं (ठेवींवरील व्याज अथवा मुदतपूर्तीच्या वेळी व्याजासकट मिळणारी निश्चित रक्कम) परंतु शेअर्सच्या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर कोणताच निश्चित परतावा नसतो. परंतु तरीही मागील 40 वर्षांचा इतिहास पाहता सर्वांत जास्त परतावा याच माध्यमातून मिळालेला दिसतो. शेअर बाजारातील गुंतवणुकीमधून दोन प्रकारचा फायदा मिळवता येऊ शकतो. एक म्हणजे भांडवल वृद्धी व दुसरा म्हणजे कंपनीकडून वेळोवेळी मिळणारा लाभांश. जेव्हा एखादी कंपनी नफा किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळविते, तेव्हा त्या उत्पन्नातील काही भाग कंपनी भागधारकांना लाभांश म्हणून वाटते. डच ईस्ट इंडिया कंपनीची नियमीत लाभांश देणारी पहिली कंपनी म्हणून नोंद इतिहासात आढळते. कंपनीचा लाभांश त्याच्या संचालक मंडळाद्वारे निश्चित केला जातो आणि त्यास भागधारकांच्या मंजुरीची आवश्यकता असते. थोडक्यात, लाभांश म्हणजे कंपनीच्या समभागधारकांना नफ्याचं वितरण. कर्जदारांना पैसे परतफेड अथवा व्याज दिल्यानंतर एखादी कंपनी आपल्या भागधारकांना लाभांश देण्यासाठी नफ्यातील काही भाग किंवा अवशिष्ट नफा वापरू शकते. तथापि, जेव्हा कंपन्यांना रोखीची कमतरता येते किंवा जेव्हा कंपनीस पुनर्गुंतवणूकीसाठी अथवा व्यवसायवृद्धीसाठी रोख रकमेची आवश्यकता असते तेव्हा कंपनी लाभांश देणं टाळू शकते. त्यामुळं, कंपनीला लाभांश देणे बंधनकारक नाही. परंतु गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी किंवा गुंतवणूकदारांच्या मनात आपली प्रतिमा चांगली राखण्यासाठी वा संबंधित क्षेत्रात आपला दबदबा राखण्यासाठी कंपनी लाभांश देत असते. अनेक लोक शेअर बाजारामधील गुंतवणुकीमधून एक ठराविक उत्पन्नाचा स्रोत म्हणूनदेखील या उत्पन्नाकडं पाहतात. परंतु या वर्षापासून लाभांश हा करमुक्त नाहीय हे देखील वाचकांनी लक्षात घ्यावं. अनेक कंपन्या अंतरीम व अंतिम अशा दोन्ही प्रकारे लाभांश वाटतात तर कांही कंपन्या अजिबात लाभांश देत नाहीत तर तो पैसा व्यवसायामध्ये पुनर्गुंतवणुकीसाठी वापरतात.

* मुख्य बाब :

एक प्रमुख गोष्ट म्हणजे, लाभांश हा कंपनीच्या दर्शनी मूल्यावर म्हणजेच टक्केवारीवर दिला जातो किंवा प्रति शेअर देखील जाहीर केला जातो. म्हणजेच अनेक वेळा आपण पाहतो की एखादी कंपनी 400 टक्के डिव्हिडंड जाहीर करते. दिसताना हा मोठा आकडा भासतो. परंतु त्या कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य जर एक रुपया असेल तर त्यावर 400 टक्के म्हणजे केवळ चार रुपयेच लाभांश मिळतो. त्यामुळं लाभांशाचा दर किती आहे यापेक्षा लाभांश उत्पन्न टक्केवारीमध्ये किती आहे हे तपासावं, त्यालाच डिव्हिडंड यील्ड म्हटलं जातं. वरील उदाहरणात जर कंपनीच्या शेअरचा भाव 10 रुपये असेल तर डिव्हीडंड यील्ड हे 40 टक्के ठरेल व शेअरचा भाव जर 400 रुपये असेल तर ते एक टक्काच ठरेल. साधारणपणे डिव्हीडंड यील्ड 8-10 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर त्यास चांगला परतावा म्हणता येईल, परंतु यावरून ती कंपनी चांगली का वाईट हे ठरवणं अवघड असतं. अनेकवेळा लाभांश जाहीर होता होता शेअर्सचा भाव आधीच खूप वाढलेला असतो त्यामुळं लाभांश मिळवण्यासाठी आपण किती वाढीनं शेअर खरेदी करतोय हे अभ्यासणं देखील महत्वाचं आहे.

* मूल्य विभाजन :

तरलता वाढवण्यासाठी व जास्त किंमतीमुळे त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करू न करणार्‍या विविध गुंतवणूकदारांना परवडणार्‍या भावात शेअर्स उपलब्ध करण्यासाठी दर्शनी मूल्यविभाजन केले जाते. यालाच स्टॉक स्प्लिट म्हणतात. म्हणजेच सुरुवातीस 10 रुपये असणारे दर्शनी मूल्य रुपये पाच किंवा दोन किंवा एक होऊ शकते आणि त्याच प्रमाणात एकूण शेअर्सची संख्या वाढते. म्हणजे, समजा 10 रुपये दर्शनी मूल्याच्या एका शेअरचा भाव 5000 रुपये असेल व त्या कंपनीच्या शेअरच्या मूल्याचं विभाजन एक रुपयात झाल्यास एका शेअरचे दहा शेअर्स होतील व त्या शेअरचा भाव 500 रुपये असेल. शेअरचा भाव कमी झाल्यानं जे किरकोळ गुंतवणूकदार त्या कंपनीचा एक शेअर 5000 रुपयांस खरेदी करण्यास धजावत नव्हते, ते मात्र 500 रुपयांना घेण्यास येऊ शकतील व त्यामुळं व्यवहारांची संख्या, त्यांमधील तरलता वाढेल. अनेकदा लोक बोनस समभाग (बोनस शेअर) व मूल्य विभाजन (स्टॉक स्प्लिट) यांमध्ये गल्लत करतात. बोनस समभागांचे वितरण केवळ त्याचे जारी केलेले भांडवल बदलते तर स्टॉक स्प्लिट कंपनीच्या अधिकृत भागभांडवलाचे विभाजन करते.  

* एक्स डेट व रेकॉर्ड डेट

ज्या दिवशी शेअरच्या भावामध्ये अशा बोनस, मूल्यविभाजनानं बदल समायोजित होतो त्या दिवसास एक्स डेट म्हणतात. रेकॉर्ड डेट म्हणजे त्या दिवशी ज्यांच्या नावावर जितके शेअर्स असतील त्याप्रमाणं असा भागधारकांना त्याचे लाभ मिळतात. त्यामुळं रेकॉर्ड डेट ही एक्स डेटनंतरच असते, बहुधा दुसर्‍या दिवशी. त्यामुळं लाभार्थ्यांसाठी एक्स डेटच्या आधी खरेदी करणं हितावह. 

* सुपर शेअर : टीसीएस

देशातील सर्वात मोठी माहिती व तंत्रज्ञान सेवा पुरवणारी कंपनी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)ने 7 ऑक्टोबर रोजी 16000 कोटी रुपयांच्या शेअर्सची पुनर्खरेदी (शेअर्स बायबॅक) प्रस्ताव जाहीर केला. 3000 रुपये हा पुनर्खरेदीसाठीचा भाव धरून 5,33,33,333 शेअर्स अथवा एकूण पेड-अप इक्विटी समभाग भांडवलाच्या 1.42 टक्के, ज्यांचं एकूण मूल्य 16000 कोटी रुपयांपेक्षा जास्त नसलेल्या या बायबॅक प्रस्तावाला कंपनीच्या बोर्डानं देखील मान्यता दिली आहे.

आता आपल्याच कंपनीचे शेअर्स बायबॅक करण्यामागं प्रमुख कारण असतं ते म्हणजे, जेव्हा कंपनी व्यवस्थापनास असं वाटतं की त्यांच्या कंपनीचं मूल्य (भाव नाही) हे बाजारात कमी आहे (अंडर व्हॅल्युएड) तेव्हा कंपनीकडं असलेल्या जास्तीच्या पैशातून (रिझर्व्हज) कंपनी बायबॅक करून गुंतवणूकदारांचा अधिक विश्वास जिंकू शकते. परंतु टीसीएसबद्दल ही गोष्ट नक्कीच तशी नाही. कारण कंपनीचा शेअर आपल्या 52 आठवडी उच्चांकी भावावर व्यवहार करत आहे आणि गेल्या सहा-सात महिन्यात कंपनीच्या शेअरचा भाव जवळजवळ दुप्पट झाला आहे. वास्तविकरित्या गुंतवणूकदारांनी आपले शेअर्स कंपनीस देऊ करणं हे ज्याच्या त्याच्या प्राधान्याची बाब आहे. परंतु या बायबॅकच्या भावनात्मकतेमुळं कंपनीचे भाव आधीच सुमारे 11 टक्क्यांपेक्षा जास्त वाढलेले आहेत आणि त्यातून जरी 10 टक्के शेअर्स जर कंपनीनं बायबॅक केले तरी मिळणारा नफा किरकोळ असेल. कंपनी इतके शेअर्स 3000 रुपयांच्या भावात देखील खरेदी करायला तयार आहे म्हणजे नक्कीच दीर्घकाळासाठी या भावातील गुंतवणूक देखील कंपनीस महाग वाटत नाहीये मग आपण आपले शेअर्स तरी का विकावेत, असा विचार दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी केला पाहिजे. लहानशा अवधीत किरकोळ नफा कमवण्याची ज्याची इच्छा आहे, ते मात्र बायबॅकमध्ये भाग घेऊ शकतात.

-प्रसाद ल. भावे (9822075888)

sharpfinvest@gmail.com

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply