आमदार प्रशांत ठाकूर यांची अधिकार्यांसमवेत पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
तळोजा रेल्वेफाटकाजवळील भुयारी मार्गाच्या कामाची आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी
(दि. 10) सिडकोच्या अधिकार्यांसमवेत पाहणी केली. हा भुयारी मार्ग येत्या 15 दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. यामुळे येथील नागरिकांना दळणवळणाची सुविधा मिळणार असून, परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यासही मदत होणार आहे.
या पाहणी दौर्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, निर्दोष केणी, संतोष पाटील, राजेश महादे, जयवंत घरत तसेच सिडको अधिकारी व
ठेकेदार उपस्थित होते.
सन 2017मध्ये तळोजा येथील सब-वेचे काम सुरू झाले. तत्पूर्वीच 2009-10पासून लोक तळोजा फेज 1मध्ये राहायला आले. तेव्हापासून येथील रहिवाशांची सब-वे व्हावा, ही मागणी होती. 2017 साली या कामाला सुरुवात झाली. मी सिडको अध्यक्ष असतानाही सातत्याने याचा पाठपुरावा केला. येथे रेल्वे क्रॉसिंग आणि हायवे असे दोन अडथळे येत होते. त्यातील एक येत्या 15 दिवसांत मोकळा होईल. मागणी पूर्ण होत असल्याने मला आनंद होत आहे. येथील नागरिकांचे जीवन सुकर होण्यासाठी यापुढेही जे जे लागेल ते मी करेन, अशी प्रतिक्रिया या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.