मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील शाळा जुलै महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोमवारी (दि. 15) शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागाच्या अधिकार्यांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे बैठक झाली. या बैठकीनंतर ऑनलाइन आणि प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.
शिक्षण विभागाने राज्यात जुलै महिन्यापासून प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याची तयारी दर्शवली होती. शाळा सुरू करण्यासंबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाली आहे. यानुसार प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल पद्धतीने शाळा सुरू करण्यात येणार आहे, तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या तसेच ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात येणार आहे.
शाळा सुरू करण्यापूर्वी सॅनिटायझेशन करणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक बेंचवर एकच विद्यार्थी बसवण्याची अट आहे, तर शिक्षक, विद्यार्थ्यांना मास्क घालणे बंधनकारक असणार आहे. शाळा सुरू करताना परिस्थितीचा आढावा घेऊनच नियोजन करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
असे भरतील वर्ग
रेड झोनमध्ये नसलेल्या नववी, दहावी, बारावी शाळा-कॉलेज जुलैपासून, सहावी ते आठवी ऑगस्टपासून, वर्ग तिसरी ते पाचवी सप्टेंबरपासून, वर्ग पहिली व दुसरी शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने, इयत्ता अकरावीचे वर्ग पुढील महिन्यात लागणार्या दहावीच्या निकालानंतर सुरू करण्याचे नियोजन आहे. ज्या ठिकाणी शाळा सुरू होणार नाहीत तिथे टाटा स्काय, जिओ यांच्या मदतीने शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट लगेचच सुरू करून त्याचा बारकाईने आढावा घेण्यात येणार आहे.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …