तिघांचा मृत्यू 239 रुग्णांची कोरोना संसर्गावर मात
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 29) कोरोनाचे 274 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे, तर 239 रुग्णांनी कोरोनावर मात केली. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 208 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 185 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 66 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर 54 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
कामोठे सेक्टर 21 शालिग्राम सोसायटी आणि कळंबोली गाव येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 34 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3030 झाली आहे. कामोठ्यात 54 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 4168 झाली आहे. खारघरमध्ये 51 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णसंख्या 4167 झाली. नवीन पनवेलमध्ये 38 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3529 झाली आहे. पनवेलमध्ये 26 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3341 झाली आहे. तळोजामध्ये पाच नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 766 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 19,001 रुग्ण झाले असून 16,699 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.88 टक्के आहे. 1884 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 418 जणांचा मृत्यू झाला आहे.