Breaking News

पवारांची प्रतिष्ठा पणास

देशाच्या राजकारणातील जाणता राजा, बदलत्या हवेचा सर्वांत आधी अंदाज येणारा तज्ज्ञ, अचूक निर्णय घेणारा धुरंधर नेता म्हणजे शरद पवार. पवारांचे राजकीय गणित सहसा चुकत नाही किंबहुना क्लिष्ट समीकरणांची आपल्या अनुभवाच्या जोरावर ते उकल करतात, असा आजवरचा इतिहास आहे. अशा या ’पॉवर’फुल्ल नेत्याची यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र कसोटी लागलेली दिसून येते.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातील अजब रसायन मानले जाते. प्रचंड महत्त्वाकांक्षा आणि दीर्घ अनुभवाच्या जोरावर वयाच्या 78व्या वर्षीदेखील ते राजकीय क्षेत्रात एखाद्या युवकाला लाजवेल अशा उत्साहाने कार्यरत आहेत. आपल्या आजवरच्या वाटचालीत त्यांनी अनेक चढाव-उतार पाहिले, पण गुणवत्ता असूनही त्यांना

निर्भेळ यश काही लाभू शकले नाही. याचे प्रमुख कारण अर्थातच विश्वासार्हतेचा अभाव. ते कधी कुणाच्या खांद्यावर हात टाकतील आणि कुणाला धोबीपछाड देतील याचा नेम नसतो. आधी घेतलेला निर्णय हळूच बदलून घूमजाव करणे हा तर त्यांचा जणू स्थायीभाव. यातून काही काळासाठी जरी फायदा झाला, तरी भविष्यात त्याची किंमत मात्र चुकवावी लागते. पवारांची सद्यस्थिती पाहिल्यास त्याचा प्रत्यय येतो.

ज्या माढा मतदारसंघातून शरद पवारांनी 2009मध्ये मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळविला, राष्ट्रवादी काँग्रेसची तीच हक्काची जागा आता धोक्यात आली आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणूक रिंगणात न उतरता पवारांनी राज्यसभेचा मार्ग चोखाळला होता. त्या वेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील माढ्यातून निवडून आले. यंदा पक्षाच्या जागा वाढाव्यात यासाठी पवारांनी पुन्हा माढ्यातून लढण्याचा निर्णय घेतला व त्यादृष्टीने तयारीही केली होती, परंतु गेल्या दहा वर्षांमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. पवारांच्या नावाला खुद्द त्यांच्याच पक्षातून विरोध झाला. याला अनेक कारणे आहेत. 2004 पासून सलग दोन टर्म केंद्रातकाँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)ची सत्ता होती आणि पवार कॅबिनेट मंत्री. या काळात त्यांनी माढ्यातील जनतेला काय दिले, असा प्रश्न उपस्थित होतो. साहेबांनी दिलेली आश्वासने पाळली नसल्याची तेथील स्थानिक कार्यकर्त्यांचीही भावना आहे. ज्या खात्याचे पवार मंत्री होते त्या कृषीक्षेत्राच्या प्रगतीमध्ये आणि शेतकर्‍यांच्या विकासासाठी त्यांनी ठळकपणे केलेले काम ते दाखवू शकत नाहीत. त्यामुळे ते जातीपातीच्या राजकारणावर आल्याचे चित्र आहे. वास्तविक पवारांनी कधीही जातीभेद केला नाही, पण अलीकडे त्यांच्या बोलण्या-वागण्यातून तो जाणवतो. त्यामुळे काही समाज त्यांच्या विरोधात गेले आहेत.

शरद पवार यांच्यासमोर अनेक आव्हाने असताना गृहकलहालाही त्यांना सामोरे जावे लागल्याची चर्चा आहे. एखादा योद्धा मैदान तेव्हा गाजवतो तेव्हा घरचे त्याच्या सोबत असतात. याउलट घरातले वातावरण जर अनुकूल नसेल, तर तो योद्धा गडबडतो. असे म्हटले जाते की, शरद पवार यांचा पार्थच्या उमेदवारीला विरोध होता. पवारांच्या कन्या सुप्रिया बारामती मतदारसंघातून निवडणूक लढतात. पवार माढ्यातून लढण्यास इच्छुक होते. त्यामुळे त्यांनी पार्थ निवडणूक लढणार नाही, असे आधी जाहीर केले, मात्र अजित व पार्थ या पवार पिता-पुत्राने कोणत्याही परिस्थितीत लढायचे ठरविले होते. त्यांनी मावळ मतदारसंघात गाठीभेटी घेत चाचपणीही सुरू केली. त्यामुळे अखेर पवारांना स्वत: माघार घेऊन पार्थचे नाव पुढे करावे लागल्याचे सांगितले जाते. खरे-खोटे पवारांना माहीत, पण पक्षाच्या जागा वाढविण्याचा प्रयत्न करताना पवार कशाला माघार घेतील? त्यांच्या माघारीचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे पवार हे मुलगी सुप्रिया, पुतण्या अजित, नातू पार्थ अशी पुढील पिढी राजकारणात आणत असताना दुसरीकडे विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह यांना अडगळीत टाकण्यात आले होते. एकवेळ राजकारणाच्या विशिष्ट टप्प्यावर येऊन पोहचलेले विजयदादा शांत बसू शकतात, मात्र प्रतिभा असलेले रणजितसिंह यांना त्यांच्या भवितव्याची चिंता होती. राष्ट्रवादीतून उमेदवारीची घोषणा होत नसल्याने अखेर त्यांनी ‘घड्याळ’ सोडून ‘कमळ’ हाती घेतले. बडे प्रस्थ आणि मोठ्या प्रमाणात समर्थक असलेल्या मोहिते-पाटील परिवारातील रणजितसिंह यांच्या हालचाली लक्षात घेऊन पवारांनी रिंगण सोडले, असे म्हणण्यास म्हणूनच वाव आहे.

माढ्यात घडलेल्या घडामोडी पाहता राष्ट्रवादी बॅकफूटवर आली आहे. भाजप उमेदवाराविरोधात त्यांनी सोलापूर जि. प.चे अध्यक्ष संजय शिंदे यांना घोड्यावर बसविले खरे, पण त्यांचा निभाव लागणे अवघड आहे; तर शिवसेना-भाजपचे प्राबल्य असलेल्या मावळमध्येही राष्ट्रवादीला लढत सोपी नाही. येथून सेनेचे श्रीरंग उर्फ आप्पा बारणे प्रतिनिधित्व करतात. त्यांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क असून, उत्कृष्ट संसदपटू म्हणून ते सर्वांना परिचित आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार पहिल्यांदाच तेही थेट लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांना पवार घराण्याचे वलय असले तरी त्यांच्यात आजोबा शरद पवार, वडील अजित पवार यांच्यासारखी चमक दिसत नाही. इंग्रजीत एक म्हण आहे ‘फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन’. याचा अर्थ असा की तुमची पहिली झलक बरेच काही सांगून जात असते, परंतु आपल्या पहिल्याच जाहीर भाषणात पार्थ पुरते गडबडले. त्यांच्या प्रचाराचा नारळ राष्ट्रवादीच्या सभेत फुटला त्या वेळी पार्थ यांनी अवघे तीन मिनिटे भाषण केले, मात्र लिहून आणलेली वाक्येही ते नीट वाचू शकले नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर ते ‘ट्रोल’ झाले. अनेकांनी आधी त्यांना चुलत बंधू रोहित पवार यांच्यासारखे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आजमावून मगच पुढे आणायला हवे होते, अशी मतेही व्यक्त केली. यावर त्यांच्या समर्थकांनी पहिल्या वेळी अनेक जण चुकतात, असे म्हणत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील पार्थ यांच्या भाषणाची चर्चा झालीच. का नाही होणार? राजकीय क्षेत्र म्हटले की पहिली आवश्यक बाब म्हणजे वक्तृत्व. राजकारणी मंडळींना इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी भाषणकला अवगत असलीच पाहिजे. त्यातही मातब्बर घराण्यातील शिलेदार म्हटल्यावर अपेक्षा वाढलेल्या असतात. परिणामी हीच का पवारांची तिसरी पिढी, असा प्रश्न पार्थ यांच्या भाषणानंतर उपस्थित झाला. 

माढ्यातून माघार, पार्थची उमेदवारी, सोडून चाललेले सहकारी हे सारे पाहता 2019ची निवडणूक शरद पवार यांच्यासाठी आतापर्यंतची सर्वांत कठीण आणि आव्हानात्मक मानली जाते. यानिमित्ताने पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणास लागली आहे. अशा प्रतिकूल वातावरणात ते कसे मार्गक्रमण करतात यावर पक्षाची पुढील वाटचाल अवलंबून आहे.

-समाधान पाटील (9004175065)

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply