Breaking News

पाकपासून स्वतंत्र होण्यास मदत करा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

भारताचा 73वा स्वातंत्र्य दिन देशातच नव्हे, तर पाकिस्तानातील बलुचिस्तानातही अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणार्‍या कार्यकर्त्यांनी सर्व भारतीय बंधू-भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. बलुचिस्तान पाकचा भाग नाही. त्यामुळे आम्हाला पाकपासून स्वतंत्र होण्यासाठी भारताने मदत करावी, असे आवाहन बलुचिस्तानातील कार्यकर्त्यांनी केले.

बलुचिस्तान हा पाकमधील एक प्रांत असून हिंसाचारामुळे चर्चेत आहे. फाळणीपासून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी जनतेतून केली जात आहे. 11 ऑगस्टला 1947 रोजी आम्हाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, गुरुवारी भारताच्या 73व्या स्वातंत्र्यदिनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी लावून धरणार्‍या कार्यकर्त्यांनी भारतातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आम्ही भारताशी जोडलो असून पाकच्या जोखडातून बलुचिस्तानला स्वतंत्र करायचे आहे. त्यामुळे भारताने मदत करावी, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली. बलुचिस्तान स्वतंत्र चळवळीचे कार्यकर्ते अत्ता बलोच म्हणाले की, माझ्या सर्व भारतीय बंधू-भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. गेल्या 70 वर्षांत केलेल्या कामगिरीचा भारतीयांना अभिमान आहे. जगभरातील भारतीय अभिमानाने वावरत आहेत. बलुचिस्तान भारताशी जोडला गेला आहे व आम्हाला मदत हवी आहे. भारताने बलुचिस्तानचा आवाज व्हावे, अशी हाकही अत्ता यांनी दिली आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply