वर्धा ः प्रतिनिधी
नोकरीचे प्रलोभन दाखवून एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणातील सहा आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, सामूहिक बलात्काराच्या या घटनेने संपूर्ण वर्धा हादरले आहे. नागपूरसह विदर्भात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. गुंडांना आणि गुन्हेगारांना पोलिसांचा तसेच कायद्याचा धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. वर्धा येथे शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास एका 19 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. वर्धा-यवतमाळ महामार्गाजवळच्या परिसरात ही धक्कादायक घटना घडली. पीडित तरुणीला नोकरीचे प्रलोभन दाखवण्यात आले होते. नोकरी मिळवून देतो, असे सांगून तिला देवळीकडे जाणार्या एका फार्म हाऊसवर नेण्यात आले. तेथे सहा जणांनी या तरुणीवर बलात्कार केला. घटनेची माहिती सावंगी पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून या घटनेतील सहाही नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. याबाबतचा अधिक तपास सावंगी पोलीस करीत आहेत.