Breaking News

कोरोनाविरोधातील लढ्यात महाविकास आघाडी अपयशी; केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची राज्य सरकारवर टीका; व्हर्च्युअल रॅलीद्वारे मार्गदर्शन

पनवेल ः प्रतिनिधी 

कोरोनाशी लढण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरत असताना भाजपचे कार्यकर्ते  तुमच्यासोबत असल्याचा विश्वास येथील जनतेला द्या, असे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी रविवारी (दि. 28) मुंबई आणि कोकण विभागाच्या भाजप व्हर्च्युअल रॅलीला संबोधित करताना सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या प्रथम वर्षपूर्तीनिमित्त त्यांच्या सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेला करून देण्यासाठी आयोजित केलेल्या व्हर्च्युअल रॅलीला दिल्लीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे, मुंबईतून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार गोपाल शेट्टी, पूनम महाजन, नारायण राणे, मनोज कोटक यांसह प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते. 

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सुरुवातीलाच मुंबई माझी कर्मभूमी असल्याचे सांगून अनेक वर्षे कमळ फुलवण्यासाठी प्रयत्न करणार्‍या कार्यकर्त्यांना वंदन केले. महाराष्ट्र आज देशात आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे कोरोनामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. मोदीजींनी ज्या वेळी कर्फ्यू पाळायला सांगितला त्यावेळी विरोधकांनी जनता कर्फ्यूची चेष्टा करून त्यांच्या संकुचित वृत्तीचा प्रत्यय करून दिला. कोरोनाशी लढण्यासाठी भाजप तुमच्यासोबत असल्याने महाराष्ट्रात मोदींनी कोरोना योद्ध्यांसाठी 50 लाख रुपयांचे  हेल्थ इन्शुरन्स कव्हर दिले. कोरोनाच्या काळात 80 कोटी नागरिकांना रेशन पोहचवले. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी 60 लाख प्रवासी मजुरांना आपापल्या गावी पोहचवण्यासाठी रेल्वेगाड्या उपलब्ध करून दिल्या. त्याचे 85 टक्के भाडे केंद्र सरकारने दिले. त्यावेळीही राज्य सरकारने आम्ही काही करणार नाही व तुम्हालाही काही करू देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. राज्याच्या मदतीसाठी केंद्र सरकार तयार आहे. कापसाच्या खरेदीबाबत राज्य सरकार अपयशी ठरले. आजपर्यंत देशात एकही पीपीई सूट बनवला नव्हता. आज त्यात आपण आघाडीवर आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. मोदी सरकारने गरीब जनतेचे बँक खाते उघडून त्यामध्ये थेट पैसे जमा केले. त्यामुळे मधले दलाल संपून गरिबांना त्याचा लाभ झाला. देशातील आठ कोटींपेक्षा जास्त गरीब महिलांना गॅस  कनेक्शन  तसेच उज्ज्वला योजनेतून तीन महिन्यांचे सिलिंडर रीफील मोफत करून दिले.

        स्वच्छ भारत योजनेतून 11 कोटींपेक्षा जास्त शौचालये बनवली. त्यामुळे गरीब महिलांना सन्मान मिळाला. शेतकर्‍यांना किसान सन्मान योजनेतून कर्जमुक्त करण्यात मदत केली. कोकणातील जनतेसाठी मत्स्य संवर्धन योजना आणली. त्याची माहिती कोकणी जनतेला कार्यकर्त्यांनी द्यावी, असेही केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले.

या वेळी राहुल गांधींवर टीका करताना त्यांना फक्त निवडणुका आल्या की मंदिर आठवते. मोदी सरकार आता राम मंदिराचे काम सुरू करीत असल्याचे सांगून त्यांनी राजीव गांधी फाऊंडेशनच्या देणग्यांचा उल्लेख करीत त्या कशाबद्दल मिळाल्या, असा प्रश्न उपस्थित केला. काँग्रेस संकुचित विचाराची असल्याने सैनिकांजवळ पुरावे मागते. आज 370 कलम हटवल्यावर टीका करीत आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी जनतेला आम्ही तुमच्यासोबत असल्याचा विश्वास देण्यास त्यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे काम लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ही व्हर्च्युअल रॅली असल्याचे सांगून आज याद्वारे कोकण आणि मुंबईतील एक कोटी लोकांपर्यंत पोहचू, असा विश्वास व्यक्त केला. कोरोना आणि निसर्ग चक्रीवादळात भाजपचे कार्यकर्ते मदत करण्यात पुढे होते. मदतकार्यातील काहींचा मृत्यूही झाल्याचे त्यांनी सांगितले. मोदी सरकार म्हणजे मजबूत नेत्याचे निर्णायक सरकार आहे. जे बोलले ते करून दाखवले. आत्मनिर्भर भारत संकल्पना मांडून सामान्य माणसांसाठी आणि शेतकर्‍यांसाठी योजना आणल्या. महाविकास आघाडीचे सरकार नाकर्ते सरकार असल्याने या योजनांचा फायदा लोकांना देऊ शकले नाही हे दुर्दैव आहे. कोरोनाच्या संकटाचा आपण सामना करीत असताना मुंबईत कमी टेस्ट करून कमी रुग्ण दाखविले जात आहेत. मृत्यूचे आकडे दडविले जात आहेत. त्यांची नंबरची लढाई सुरू असून त्यामध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याची टीका त्यांनी केली. कोकणात मदत करण्यासाठी आमचे आमदार तिथे जाऊन मदत करीत आहेत, पण सरकार गुंठ्याला 500 रुपये अशी अत्यंत कमी मदत देत असल्याचे सांगून त्यांनी जास्त मदत देण्याची मागणीही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केली.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply