आयसीसीने विचारलेल्या प्रश्नास चाहत्यांचा प्रतिसाद
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने क्रिकेट चाहत्यांना या दशकातील सर्वांत आवडत्या कर्णधाराची निवड करण्यास सांगितले आहे.
आयसीसीने ट्विटरवरून चाहत्यांना हा प्रश्न विचारला. या प्रश्नावर चाहत्यांनी त्यांची उत्तरे दिली आहेत. यामणध्ये सर्वाधिक चाहत्यांनी कर्णधार म्हणून भारतीय खेळाडूंची निवड केली आहे. क्रिकेटमधील या दशकातील सर्वांत आवडता कर्णधार म्हणून अनेक नेटिझन्सने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचीच अग्रक्रमाने निवड केली आहे.
धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007मध्ये टी-20 वर्ल्ड कप, 2011मध्ये वर्ल्ड कप आणि 2013मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले होते. धोनीने 2014मध्ये कसोटीचे आणि 2017मध्ये वन डे क्रिकेटचे कर्णधारपद सोडले होते. आयसीसीने विचारलेल्या प्रश्नावर अनेक यूझर्सनी धोनीची निवड केली आहे. धोनीसोबतच काहींनी विराट सर्वांत आवडता कर्णधार असल्याचे म्हटले आहे.
धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने 2010, 2011 आणि 2018मध्ये विजेतेपद मिळवले होते, तर चॅम्पियन्स लीग टी-20 स्पर्धेचे 2010 आणि 2014मध्ये विजेतेपद धोनीने मिळवून दिले होते. धोनीने वन डेमध्ये 10 हजार 773 धावा, तर विकेटकिपर म्हणून 444 गडी बाद केले आहेत. वन डेमधील धोनीची सरासरी 50.57 इतकी आहे. यात 10 शतके आणि 73 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 183 धावा ही त्याची सर्वोच्च खेळी आहे, तर कसोटीमध्ये चार हजार 876 धावासंह 294 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत धोनीची सरासरी 38.09 इतकी आहे. कसोटीत धोनीने सहा शतके आणि 33 अर्धशतके केली असून 224 ही त्याची
सर्वोत्तम खेळी आहे. टी-20 प्रकारात धोनीच्या नावावर एक हजार 617 धावा, तर 91 विकेट्स जमा आहेत. टी-20मध्ये धोनीने आतापर्यंत 98 सामने खेळले आहेत. 37.60च्या सरासरीने त्याने एक हजार 617 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचाही समावेश आहे.