कर्जत ः बातमीदार
कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर डिकसळ-नेरळ भागातील रस्त्यावर वडवली गावाजवळ असलेला टाटाची वीज वाहून नेणारा भलामोठा खांब वाहनांसाठी धोकादायक ठरत आहे. हा वीजवाहक खांब अगदी रस्त्यावर असून कोणत्याही क्षणी तेथे मोठा अपघात होऊ शकतो अशा प्रकारे त्या खांबाची रचना आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेली 10 वर्षे त्या खांबाबाबत कोणत्याही हालचाली केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे रस्त्याचे दुपदरीकरण झाल्यानंतर आणि आता त्या रस्त्याचे काँक्रीटीकरण झाल्यानंतरही तो खांब रस्त्यात असूनदेखील त्याबाबत कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्याचे दुपदरीकरण 2009मध्ये एमएमआरडीएकडून सुरू करण्यात आले. त्यानंतर त्या रस्त्याचे काम दोन वर्षांनी पूर्ण झाल्यानंतर वडवली गावाजवळ टाटाची वीज वाहून नेणारा खांब तेथे होता. त्यामुळे रस्त्याच्या दुपदरीकरणाला अडचण येत होती. तो वीजवाहक खांब अन्य ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाने करण्याची गरज होती. वाहनचालक गेली 10 वर्षे वडवली येथे तो विजेचा खांब चुकवून आपला प्रवास करीत होते. अनेकदा त्या विजेच्या खांबाबद्दल स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या आहेत, तर पोलीस मित्र संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे यांनीदेखील आवाज उठविला होता.
-आमच्या वडवली गावासमोर रस्त्याची अवस्था धोकादायक बनली आहे. त्या ठिकाणी असलेल्या खांबामुळे वाहनचालकांचा अपघात होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बाजूलाच ग्रामस्थांची घरेदेखील आहेत. त्यामुळे त्या रस्त्यावर असलेल्या वीजवाहक खांबाबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
-रमेश लदगे, सरपंच, आसल ग्रामपंचायत
-टाटा कंपनीचा तो वीजवाहक खांब असून तो हलविण्याची प्रक्रिया तशी सहजासहजी शक्य नाही. तरीदेखील आम्ही प्रयत्न करीत असतो, पण त्यात यश येत नाही. त्यामुळे या खांबाची माहिती
वाहनचालकांना मिळावी यासाठी आम्ही नियोजन करणार आहोत.
-अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता, सा. बां. विभाग