नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
देशात कोरोना लसीचा सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्राला करण्यात आला आहे. लस वितरणात लोकसंख्येचा निकष नाही. लोकसंख्येचा विचार करायला गेले, तर मग सर्वाधिक लस उत्तर प्रदेशला मिळायला हवी होती, पण, तसे झाले नाही, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे. ते वृत्तवाहिनीशी बोलत होते.केंद्राकडून लस वितरणात राजकारण होत असल्याचा आरोप राज्यातून केला गेला, तर दुसरीकडे केंद्राकडून राज्याचे आरोप फेटाळून लावण्यात आले होते. लस वाटपावरून पेटलेल्या मुद्द्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी भूमिका मांडली आहे. आजतक सीधी बात या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, अनेक लसीकरण केंद्रावर लस संपल्याचे सांगितले जात आहे, पण केंद्र सरकार थेट लसीकरण केंद्रापर्यंत लस पुरवठा करीत नाही. केंद्र राज्य सरकारला लस पुरवठा करते. त्यानंतर लसीकरण केंद्रापर्यंत लस घेऊन जाणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. निर्धारित वेळेत लसीचे डोस लसीकरण केंद्रापर्यंत घेऊन जाणे हे राज्य सरकारचे काम आहे. यात जर कुठल्या राज्याने नियोजन केलेले नसेल आणि लसीचे डोस खराब होत असतील तर ते राज्य सरकारचे अपयश आहे. लस वितरणात कोणतेही राजकारण केले जात नाहीये.
लसींच्या तुटवड्याचा दावा पडला उघडा
मुंबई ः देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांकावर असून, राज्याने त्यात विक्रमी नोंद केली आहे. रविवारी (दि. 11) सकाळपर्यंत राज्यात एक कोटी 38 हजार 421 जणांना लस देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. या विक्रमी लसीकरणामुळे केंद्र सरकार लसींचा पुरवठा करीत नाही हा राज्य सरकारचा दावा एक प्रकारे उघडा पडला असल्याची चर्चा आहे.