Breaking News

खोळंबलेल्या शेतीकामांना वेग; पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावले; तालुक्यातील सरासरी मात्र जेमतेमच

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुक्यात जुलै महिन्यात तब्बल 20 दिवस पावसाने उघडीप घेतली होती. त्यामुळे तालुक्यातील उंचावर असलेल्या भागातील व कशेळेपासून पुढे माळरानावर असलेल्या जमिनीवरील भातलावणी पाण्याअभावी अर्धवट राहिली होती. दरम्यान, मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसाच्या सरींनी शेतीची कामे पुन्हा नव्या जोमाने शेतकर्‍यांनी सुरू केली आहेत, मात्र तालुक्यातील पावसाची सरासरी मागील अनेक वर्षांच्या तुलनेत जेमतेमच आहे.

2019मध्ये तालुक्यात 3397 मिलीमीटर पाऊस झाला होता. या वर्षी मात्र जुलैअखेर खूपच कमी पाऊस झाला होता. त्यामुळे जुलैत होणारी भातलावणी वेळेत पूर्ण झाली नाही. 10 हजार हेक्टर जमिनीपैकी 25 टक्के जमिनीवर केली जाणारी भातशेती पावसाने दडी मारल्याने पूर्ण झाली नव्हती. कशेळेपासून ओलमण व नांदगावपर्यंत मोठ्या प्रमाणात माळरानावर भातशेती केली जाते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता असते. यंदा जुलैतील 20 दिवस पाऊस झालाच नाही. त्यामुळे माळरानाच्या जमिनीतील मोग्रज, पाथरज, खांडस, नांदगाव, वारे, कशेळे, ओलमण, कळंब, पाषाणे, साळोख या ग्रामपंचायत हद्दीतील शेतकर्‍यांना भातशेती करता आली नव्हती. जुलैअखेर तालुक्यात वार्षिक सरासरी 30 टक्के इतकाच पाऊस झाला होता.

मात्र नारळी पौर्णिमेनंतर पावसाने पुन्हा जोर पकडला. मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांनी आपली अर्धवट राहिलेली भातलावणी पूर्ण करण्यास सुरुवात केली. आदिवासी शेतकर्‍यांची जमीन माळरानावर असून या शेतकर्‍यांनी मंगळवारपासून शेतीची कामे करण्यास सुरुवात केली. या वेळी मात्र कामे खोळंबून राहिलेल्या शेतकर्‍यांना त्या त्या गावातील व आदिवासी वाडीमधील शेतकर्‍यांनी मदतीचा हात दिला. पूर्वी शेतात जमिनीचे मालक असलेल्या कुटुंबातील चार माणसे एकत्र काम करताना दिसायची, मात्र मागील दोन दिवसांपासून शेतकर्‍यांच्या शेतात समूहाने लोक काम करताना दिसून येत आहेत. लॉकडाऊनमुळे घरीच असलेले लोक आपल्या शेजारच्या माणसाची मदत करीत असल्याचे आशादायक चित्र तालुक्यात सर्वत्र दिसत आहे. तालुक्यातील सर्व भागात दोन दिवस पावसाने झोडपून काढल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत, मात्र तालुक्यातील पावसाची सरासरी या संततधार पावसामुळे वाढलेली दिसत नाही.

आमच्या शेतात पुन्हा पाणी खळाळू लागल्यानंतर शेतकर्‍यांनी भातशेती पूर्ण करण्यासाठी धावपळ केली. त्या वेळी पहिल्यांदा शेतात आजूबाजूचे लोक मदत करताना दिसले. असे आशादायी चित्र पाहून लॉकडाऊनमध्ये माणुसकी वाढली, असेच म्हणावे लागेल.

-भरत शिद, अध्यक्ष, आदिवासी समाज संघटना

Check Also

जनहितासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच पुढाकार -मंत्री गणेश नाईक

आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी असल्याचेही गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर …

Leave a Reply