पेण ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून महामार्गावरून वाहने चालविणे अवघड झाले आहे. त्यामुळे येत्या 10 दिवसांत पेण-वडखळ रस्ता पूर्ववत करण्यात यावा, अन्यथा आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा पेण भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी दिला आहे.
गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा या दृष्टिकोनातून मुंबई-गोवा महार्गावर शासनाच्या वतीने उपाययोजना होणे गरजेचे असताना दोन दिवस पडलेल्या पावसामुळे या मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पेण-वडखळ मार्गावर तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीला ठेकेदारांचा चालढकलपणा व अधिकारीवर्गाचा दुर्लक्षपणा कारणीभूत असून त्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. खड्डे व चिखलामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, असे श्रीकांत पाटील यांनी सांगितले. संततधार पावसामुळे ठेकेदाराने केलेले निकृष्ट काम चव्हाट्यावर आले असून काही दिवसांपूर्वी भरपावसात डांबरीकरण करीत असल्याचे प्रतापही समोर आले असताना शासकीय अधिकारी मात्र कार्यवाही न करता चुप्पी साधून गप्प बसले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने जातीने लक्ष घालून महामार्गाची दुरुस्ती करून गणेशभक्तांना दिलासा देण्याचे काम करावे, अन्यथा मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुका भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी दिला आहे.