देशातील 78 टक्के लोक कामगिरीवर समाधानी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसर्या कार्यकाळाला आता सव्वा वर्ष पूर्ण होत आले आहे. या काळात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने कलम 370 हटवण्यासह ट्रिपल तलाक आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (सीएए) मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच एका सर्व्हेक्षणानुसार देशातील 78 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे. यासोबतच पुढील पंतप्रधान म्हणूनही मोदीच देशवासीयांना हवे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
इंडिया टुडे ग्रुप आणि कार्वी इनसाइड्स लिमिटेड या संस्थेने केलेल्या सर्वेनुसार देशातील 78 टक्के लोकांनी मोदींची कामगिरी चांगली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही कुठल्याही नेत्याला मोदींच्या आसपासही जाता आले नाही. या
सर्वेनुसार नरेंद्र मोदी हेच देशाचे पुढील पंतप्रधान असले पाहिजेत, असे 66 टक्के लोकांनी नमूद केले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी दुसर्या स्थानी राहिले. केवळ आठ टक्के लोकांनी त्यांच्या नावाला पसंती दिली.
याशिवाय काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना भावी पंतप्रधान म्हणून पाच टक्के लोकांनी गुण दिले आहेत. चार टक्के लोकांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाला पसंती दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना प्रत्येकी तीन टक्के मिळाले, तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना प्रत्येकी दोन टक्के मतदारांनी पसंती दिली आहे.
लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये योगी अव्वल स्थानी कायम
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सलग तिसर्यांदा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले आहेत. इंडिया टुडे ग्रुप आणि कार्वी इनसाइट्स संस्थेने केलेल्या मूड ऑफ द नेशन 2020 सर्वेक्षणात योगी आदित्यनाथ यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत.
आदित्यनाथ यांनी एकूण 24 टक्के मते मिळवली. गेल्या वेळी केलेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत ही मते सहा टक्क्यांनी वाढली आहेत. ‘टॉप फाईव्ह’मध्ये 15 टक्के मिळवून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दुसर्या स्थानावर आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगमोहन रेड्डी 11 टक्क्यांसह तिसर्या क्रमांकावर आहेत. त्यांच्यानंतर चौथ्या स्थानी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (नऊ टक्के) आणि पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (सात टक्के) आहेत.