Breaking News

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे निकष बदला : आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : प्रतिनिधी
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ महापालिका हद्दीतील सर्वच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणार्‍या रुग्णांना मिळत नाही. याबाबतचे निकष राज्य शासनाने बदलण्याची गरज असल्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 8) महापालिका आयुक्तांबरोबरच्या बैठकीत बोलताना केली.
पनवेल महापालिका हद्दीत कोविड-19च्या रुग्णांसाठी महापालिकेने प्राधिकृत केलेल्या रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ रुग्णांना मिळत नसल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयक्त सुधाकर देशमुख यांचे लक्ष वेधले. त्यावर या योजनेचा लाभ रुग्णांना मिळण्यासाठी त्या रुग्णालयात 50 बेड्सची आवश्यकत्ता असल्याचे आयुक्तांनी सांगितले. पनवेल महापालिकेने कोविड-19च्या रुग्णांसाठी महापालिकेने प्राधिकृत केलेल्या रुग्णालयांपैकी फक्त एकाच रुग्णालयात 50 बेड्स आहेत आणि इतर रुग्णालयांत 20 किंवा कमी बेड्स असल्याने रुग्णांना या योजनेचा फायदा मिळत नसल्याची माहिती त्यांनी दिली.
या संदर्भात बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे निकष ठरवले तेव्हा कोविड-19 अस्तित्वात नसल्याने आता या निकषात बदल करण्याची गरज आहे. त्यासाठी शासनाकडे आपण पत्र देऊच, पण सत्ताधारी आमदारांनीही याबाबत आग्रह धरावा.
या बैठकीत ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करण्याबाबतही चर्चा झाली. महापालिकेने आठवडाभरात 40 बेड्स उपलब्ध होतील, असे सांगितले. कोविड-19वरील रेमडीसीवीर इंजेक्शन रुग्णांना काळ्या बाजारात जास्त किंमत मोजून खरेदी करावे लागत आहे. तसे होऊ नये यासाठी एक हजार इंजेक्शन्सची खरेदी करावी, असेही महापालिका प्रशासनाला या वेळी सूचित करण्यात आले.    
या बैठकीला महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक संजय भोपी आदी उपस्थित होते.
सर्व दुकाने दररोज उघडण्याची परवानगी द्या
पनवेल महापालिका हद्दीतील दुकाने सम-विषम (पी-1, पी-2)ऐवजी दररोज उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे या वेळी केली. याबाबत दोन दिवसांत विचार करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. त्यामुळे व्यापार्‍यांना दिलासा मिळणार आहे
गणेशोत्सवाबाबत मार्गदर्शन आणि निर्णय घेण्याबाबत आयुक्त सुधाकर देशमुख यांनी महापालिकेत बैठक बोलाविली होती. या वेळी आमदार प्रशांत ठाकूऱ यांनी महापालिका हद्दीत दुकानांना सम-विषमऐवजी ती दररोज उघडी ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी केली. ते म्हणाले, सण-उत्सवांच्या काळात व्यापार्‍यांना दैनंदिन व्यवसायासाठी परवानगी दिल्यास दुकानांमध्ये होणारी गर्दी कमी होईल. या वेळी त्यांनी मुंबई आणि पुणे महापालिकेने घेतलेल्या निर्णयाकडे आयुक्तांचे लक्ष वेधले. त्यावर आयुक्तांनी आपण पुणे महापालिकेच्या निर्णयाची माहिती घेऊन दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.  
पनवेल महापालिका हद्दीत दहीहंडी सण साजरी करण्याबाबत चर्चा करताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी जन्माष्टमीचा उत्सव अनेक वर्षे परंपरागत सुरू आहे. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून पूजेला परवानगी द्यावी, अशी मागणी केली. त्यानुसार पूजेला परवानगी देण्याचे ठरले, तर गणेशोत्सव साजरा करताना शासनाच्या नियमावलीचे पालन करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. यात सर्वसाधारण नियमांबरोबरच पनवेलमध्ये प्रत्येक प्रभागात कृत्रिम तलाव तयार करून त्यात महापालिकेने नेमणूक केलेले कर्मचारीच मूर्तीचे विसर्जन करतील. त्यासाठी मनपा कृत्रिम तलाव तयार करणार आहे. नदीत विसर्जन करण्यासाठीही तराफ्यावर महापालिकेचे कर्मचारीच असतील, असे ठरले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply