भाजप नेते संदीप पाटील यांची भूमिका
पनवेल : वार्ताहर
निसर्ग चक्रीवादळापाठोपाठ आलेल्या वादळी वार्यांनी पनवेल परिसरामध्ये वाताहत केली आहे. या दोन वादळांचा तडाखा सहन केल्यानंतर शेकडो बहुवार्षिक वृक्ष उन्मळून पडले. वृक्ष पडझडमध्ये नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरीसुद्धा उन्मळून पडलेल्या वृक्षांबाबत यंत्रणेचे बोटचेपीचे धोरण राहिले आहे. पर्जन्यमान वाढविण्याच्या हेतूने रोपण केलेल्या या वृक्षांच्या छाटणीची सिडकोने जबाबदारी घेतलीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका माजी नगराध्यक्ष संदीप भरत पाटील यांनी घेतली आहे.
याबाबत प्रस्तूत प्रतिनिधीने संदीप पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी विस्तृतपणे ही परिस्थिती मांडली. ते म्हणाले की वादळी वार्यांनी या वर्षी शेकडो बहुवार्षिक वृक्ष उन्मळून पडले, याच वृक्ष छाटणी बाबत अनेक असोसिएशन मधील नागरिकांनी महानगरपालिका तथा सिडको कार्यालयांमध्ये वृक्ष छाटणी चे शुल्क अदा केले होते. परंतु या दोन्ही आस्थापनांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलली असल्याने असे अनेक वृक्ष छाटले गेले नाहीत. नागरिकांशी संवाद साधला असता अनेक वृक्षांचे शुल्क जमा करून देखील असे धोकादायक वृक्ष छाटणी न झाल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. सिडको केवळ रस्त्यावर लावलेल्या वृक्षांची जबाबदारी घेऊ असे म्हणते परंतु ते चुकीचे आहे. वास्तविक अनेक असोसिएशन व सोसायट्यांचे हद्दीत सिडकाने वृक्षारोपण केले आहे. तर दुसरीकडे महानगरपालिका शुल्क घेऊन सुद्धा काम करत नाही.
संदीप पाटील पुढे म्हणाले की, शुल्क घेऊन सुद्धा नागरिकांना हाल सहन करावे लागत असतील तर तो त्यांच्यावर अन्याय असेल. वास्तविक मान्सून पूर्वी सिडकोने बहुवार्षिक वृक्षांची 50 टक्के छाटणी केल्यास वृक्ष संवर्धनाचे दृष्टीने ते सुयोग्य होईल, कारण तसे केल्यास नवे धुमारे फुटून ते जोमाने वाढतील, तसेच जमा होणारे लाकूड फाटा त्या त्या विभागांतील स्मशानात दिल्याने गोर गरीब नागरिकांच्या अंत्यसंस्कारासाठी त्याचा वापर होईल. त्यामुळे सिडको व महापालिका यांनी जबाबदारीचे चेंडू एकमेकांच्या अंगणात धकलण्या पेक्षा माझ्या सूचनेचा गांभीर्याने विचार करावा. संदीप पाटील यांची सूचना अत्यंत योग्य असून परिसरातील नागरिकांनी या सूचनेचे स्वागत केले आहे.