नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यात मध्य प्रदेशमधील इंदौर हे देशातील सर्वांत स्वच्छ शहर ठरले असून, सलग चौथ्यांदा इंदौरने बाजी मारली आहे. गुजरातमधील सूरत दुसर्या क्रमांकावर, तर महाराष्ट्रातील नवी मुंबईने तिसर्या स्थानी झेप घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 20) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या निकालांची घोषणा केली.
स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईसह महाराष्ट्रातील इतर शहरांचाही समावेश आहे. यामध्ये नाशिक 11, ठाणे 14, पुणे 15, नागूपर 18, कल्याण डोंबिवली 22, पिंपरी चिंचवड 24, औरंगाबाद 26, वसई-विरार 32 आणि मुंबई 35व्या क्रमांकावर आहे.
याआधी ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत कचरामुक्त शहर मोहिमेत देशातील पाच शहरांत नवी मुंबईला स्थान मिळाले होते. नवी मुंबई राज्यातील एकमेव शहर ठरले होते. या वेळी नवी मुंबईला पंचतारांकित दर्जा मिळाला होता, तर स्वच्छ सर्वेक्षण 2019मध्ये नवी मुंबईने स्वच्छ शहरांत राज्यात प्रथम व देशात सातवा क्रमांक मिळवला होता.
महाड पालिका कोकणात अव्वल
महाड : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण 2020मध्ये रायगड जिल्ह्यातील महाड नगर परिषदेने राष्ट्रीय पातळीवरील पश्चिम विभागामध्ये 13वा क्रमांक, महाराष्ट्रात 12वा क्रमांक, तर कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकाविला असल्याची माहिती मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी दिली. पश्चिम विभागात महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या चार राज्यांचा समावेश आहे.
Check Also
कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा
कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …