पनवेल ः रामप्रहर वृत्त : देशभर उद्रेक माजवलेल्या कोरोनाचा सर्वांनीच धसका घेतला आहे. शाळा, कॉलेजेस, मॉल्स तसेच विविध कार्यक्रमही शासनातर्फे बंद ठेवण्यात आले आहेत. असे असले तरी 24 तास कर्तव्य बजावत असणार्या पोलिसांना स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतःच घ्यावी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलिसांनीही सतर्कता दर्शविली आहे. पोलीस ठाण्यात येणार्या प्रत्येक व्यक्ती, अधिकारी व कर्मचार्यांना प्रवेशद्वाराजवळच सॅनिटायझजरने हात धुवून मगच आत पाठवण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने देशासह राज्यात एकच हाहाकार माजविला आहे. त्याचा धसका सर्वसामान्यांपासून उच्चभ्रूंपर्यंत सर्वांनीच घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा-महाविद्यालये, मॉल्स तसेच विविध कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. परिणामी 24 तास कर्तव्य बजावणार्या पोलिसांना स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतःच घ्यावी लागणार आहे. पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचार्यांचे आरोग्य तसेच पोलीस ठाण्यात येणारे तक्रारदार व इतर कामासाठी येणारे नागरिक यांच्या आरोग्याचीसुद्धा काळजी घेण्याच्या उद्देशाने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि. अजयकुमार लांडगे यांनी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळच एक कर्मचारी उभा ठेवला आहे. तो कर्मचारी आतमध्ये येणार्या प्रत्येक व्यक्तीला सॅनिटायझरने हात धुवूनच आत पाठवतो. त्याचप्रमाणे पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी- कर्मचारीसुद्धा नाकाला रूमाल किंवा मास्क लावूनच काम करताना दिसून येत आहेत.