Breaking News

ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांचे निधन

कर्जत : प्रतिनिधी

बातमीदार माथेरान येथील ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र न्यूज 24चे संपादक संतोष पवार (वय 54) यांचे बुधवारी (दि. 9) सकाळच्या सुमारास वेळेवर उपचार उपलब्ध न झाल्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने रायगड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. संतोष पवार यांची रायगड जिल्ह्यातील पत्रकारांचा आधारस्तंभ म्हणून ओळख होती. रायगड प्रेस क्लबचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. माथेरान नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविला होता. दोन वर्षांपूर्वी त्यांनी महाराष्ट्र न्यूज 24 हे यू ट्यूब चॅनेल सुरू केले होते. पवार यांना बुधवारी पहाटेच्या सुमारास श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. उपजिल्हा रुग्णालयात पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला. तेथे त्यांच्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बेड आरक्षित केला होता. तेथे नेत असताना खालापूर तालुक्यातील भिलवलेनजीक 108 अ‍ॅम्ब्युलन्समधील टाकीतील ऑक्सिजन संपला. त्यानंतर दुसरी ऑक्सिजन टाकी लावत असताना प्रेशर वाढला आणि त्या टाकीचे झाकण सर्व उपकरणांसह फेकले गेले व त्यातील पूर्ण ऑक्सिजन बाहेर पडला. त्यामुळे त्यांना लगेचच ऑक्सिजन उपलब्ध झाला नाही. अशातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, पुत्र, कन्या, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply