खोपोली : प्रतिनिधी
अर्णव गोस्वामी संपादक असलेल्या रिपब्लिक टीव्हीच्या तीन पत्रकारांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खालापूर तालुक्यातील भिलवले येथील फार्म हाऊसमध्ये शिरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अनुज कुमार, जसपाल सिंह व प्रदीप धनवडे अशी या तिघांची नावे आहेत. तिघांनाही अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तिघे पत्रकार मंगळवारी (दि. 8) संध्याकाळी 7.30च्या दरम्यान टुरिस्ट कारने आले होते. त्यांनी पहिल्यांदा इम्तियाज खत्रीचा बंगला कुठे आहे, असे विचारले. त्यानंतर एका व्यक्तीला मुख्यमंत्र्यांचा बंगला कुठे आहे, असे विचारले. त्यावर त्या व्यक्तीने माहीत नाही, असे सांगितले. त्यानंतर हे तिघे पत्रकार तिथून निघून गेले. नंतर पुन्हा तिथे आले तर तो व्यक्ती बंगल्यात दिसला. त्या वेळी खोटे का बोलला म्हणून या तिघा पत्रकारांनी त्या कर्मचार्याला शिवीगाळ करीत मारहाण केली आणि तिथून पळून गेले. नंतर त्या कर्मचार्याने आपल्या वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. मग पोलिसांना माहिती दिली गेली आणि नाकाबंदी करून या तिघांना पकडण्यात आले. विनापरवानगी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न केल्याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी मुख्यमंत्री तसेच इतर नेत्यांबाबत केलेल्या विधानांवरून गोस्वामी यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडण्यात आला आहे.