Breaking News

पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यू प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी

कर्जत : बातमीदार
ऑक्सिजन सिलिंडर बदलताना झालेल्या चुकीमुळे या सिलिंडरचा स्फोट झाला आणि ऑक्सिजनअभावी पत्रकार संतोष पवार यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूस शासनाची आरोग्य यंत्रणा जबाबदार असून, दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी पवार कुटुंबीय तसेच सहकारी पत्रकार यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे संतोष पवार यांचा मृत्यू झाला असून, संबंधित आरोग्य यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी पवार यांच्या कुटुंबाने केली आहे. याबाबतचे पत्र दिवंगत संतोष पवार यांचे पुत्र मल्हार यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हाधिकारी यांना धाडले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, माझे वडील संतोष पवार यांना सकाळपासून सुरू असलेला ऑक्सिजन सिलिंडर रुग्णाला नवी मुंबईत नेईपर्यंत पुरेल का याची रुग्णालय अधीक्षक यांनी खात्री केली नाही आणि अर्धवट संपलेला सिलिंडर लावून रुग्णवाहिका पुढे नेल्याने दुर्घटना घडली.
नवीन ऑक्सिजन सिलिंडर कर्जत उपजिल्हा रुग्णालयातून निघताना का लावला नाही? अर्धवट ऑक्सिजन सिलिंडरबाबत रुग्णालयाला कोणतीही कल्पना नव्हती का? की आपल्या कामात त्यांनी जाणुनबूजून कसूर करीत आहे तो ऑक्सिजन सिलिंडर बदलण्याची तसदी घेतली नाही? शासनाच्या 108 क्रमांकाच्या रुग्णालयात प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी नेमले आहेत, तर मग त्या वैद्यकीय अधिकार्‍यांना ऑक्सिजन सिलिंडर बदलता येत नाही का? त्याचवेळी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उभी असलेली कार्डिक रुग्णवाहिका फक्त शोभेसाठी उभी करून ठेवली आहे व त्या नव्याकोर्‍या कार्डिक रुग्णवाहिकेला आरोग्य विभागाने स्टाफ का दिला नाही? सुसज्ज 108 रुग्णवाहिकेत प्रशिक्षित स्टाफ नसेल तर मग त्याबाबत आम्हाला का कल्पना देण्यात आली नाही, असे अनेक प्रश्न पवार कुटुंबीयांनी उपस्थित केले आहेत.
अशाच प्रकारे कर्जतमधील पत्रकारांनी शासनाचे लक्ष वेधून संतोष पवार यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
आज राज्यभर श्रद्धांजली सभा
मुंबई : मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस आणि माथेरानचे पत्रकार संतोष पवार तसेच राज्यातील अन्य 13 दिवंगत पत्रकारांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राज्यभर शुक्रवारी (दि. 11) सकाळी 11 वाजता तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांच्या वतीने श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात येत आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या झुम बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply