सतत बत्ती गूल होत असल्याने अभियंत्याचा सत्कार
मुरूड : प्रतिनिधी
मुरूड तालुक्याला स्विचिंग सेंटर प्राप्त होऊनसुद्धा वीजपुरवठा दिवसातून अनेक वेळा खंडित होत असल्याने मुरूड शहरातील नागरिकांनी एकत्र येत महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांचा गांधीगिरी करीत सत्कार केला.
मुरूड तालुका सुपारी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन महेश भगत यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन हा अनोखा सत्कार करण्यात आला. जिल्हा शांतता कमिटीचे सदस्य आदेश दांडेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनोहर गुरव, उदय चौलकर, बाळकृष्ण गोंजी, कुणाल सतविडकर, शुभांगी करडे, सीमा दांडेकर, स्वप्नील चौलकर आदी उपस्थित होते.
या वेळी महेश भगत यांनी सांगितले की, मुरूड शहरात सातत्याने बत्ती गूल होत असते. त्याचप्रमाणे वीजपुरवठा कमी-जास्त दाबाने होत असल्याने घरातील विद्युत उपकरणे खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे.
आदेश दांडेकर म्हणाले की, शासनाने ग्राहकांना दिलेले वीज बिल हे टप्प्याटप्प्याने भरावयास सांगितले असतानासुद्धा वीज कर्मचारी लोकांना थेट रक्कम भरण्याचे सांगत आहेत. त्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत. याबाबत येरेकर यांना सूचना देण्यात आल्या.
मुरूड तालुक्यातील 10 कर्मचार्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. त्यामुळे माझ्याकडे आता कमी मनुष्यबळ आहे. ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी आमचे प्रयत्न असतात. वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करू.
-सचिन येरेकर, उपकार्यकारी अभियंता, महावितरण