पाली : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यातील असंख्य गावे, आदिवासी वाड्या-पाड्यांत पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. उन्हाळ्यामध्ये तर ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणावर डोकेवर काढते. मात्र रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कोस्ते या गावात भरपावसात येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. कोस्ते गाव पावसाळ्यातही तहानलेले आहे. सरकारी अधिकार्यांकडे गार्हाणे मांडुनदेखील कोस्ते ग्रामस्थांना न्याय मिळत नाही.
कोस्ते हे मुख्य रस्त्यावरील एक गाव. गावात तशी कोणतीच समस्या नाही. गावात रोजगार मिळावा म्हणून दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने जेटीएल या पाईप बनविणार्या कंपनीला प्लँट उभारण्यासाठी ना हरकत दिली. गेल्या काही दिवसांपासून ही कंपनी गॅव्होनाईज पाईप बनवित आहे. यामुळे बाहेर पडणार्या रसायनांमुळे काळ नदीचे पाणी प्रदुषित झाले असून, गावावर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. राज्य शासनाने न्याय द्यावा व पिण्यासाठी शुद्ध पाणी द्यावे, अशी मागणी लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ करीत आहेत.