मुरूड : प्रतिनिधी
मागील तीन दिवसांपासून तसेच अधूनमधून बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प झाल्यामुळे मुरूड येथील पोस्ट खात्याचा कारभार वारंवार ठप्प होत होत असून, ग्राहकवर्ग त्रस्त होत आहे. बीएसएनएल टेलिफोन कार्यालयाकडून पोस्ट कार्यालयास नेटची सुविधा पुरविली जाते, मात्र बीएसएनएलकडून नेट सेवा वारंवार खंडित होत असल्याने आणि प्रभावी कार्यवाही होत नसल्याने ग्राहकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत पोस्ट खात्यामधील अनेक ग्राहकांनी प्रस्तुत प्रतिनिधीस संपर्क साधून मुरूड पोस्ट खात्याने नेटसेवेसाठी इतर सुविधा घेऊन ग्राहकांना सेवा पुरवावी अशी मागणी केली आहे. कारण बीएएनएल सेवा वारंवार बंद पडून पोस्ट खात्याचा कारभार ठप्प होत असल्याने लोकांना त्यांच्या खात्यामधील रक्कम न मिळणे, रजिस्टर एफडी, स्पीड पोस्ट व असंख्य सेवांचा लाभ घेता येत नाही. प्रत्येक दिवशी ग्राहकांना नेट नसल्याने रिकाम्या हाताने जावे लागत आहे. हा प्रकार आठ दिवस ठीक, तर पुन्हा नेट बंद असे प्रकार वारंवार घडत आहेत. या संदर्भात पोस्ट खात्याशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या सर्व कार्यालयांत बीएएनएल सेवाच वापरली जाते. इतर सेवा आम्हाला घेण्याची परवानगी नाही.त्यामुळे आम्ही इतर सेवा घेऊ शकत नाही, परंतु पोस्ट खात्याने इतर कंपनीचा नेट न घेतल्यामुळे मुरूड तालुक्यातील पोस्ट खात्याची सर्व कामे ठप्प होऊन ग्राहकांमध्ये वाढती नाराजी उत्पन्न होऊन परिणामतः पोस्ट खात्यामधील खातेदार कमी होत आहेत. त्यामुळे पोस्ट खात्याचेसुद्धा आर्थिक नुकसान होत आहे. पोस्ट खात्याने मुरुड कार्यालयासाठी प्रभावी नेट सेवेचा वापर करावा, अशी मागणी असंख्य ग्राहकडून होत आहे. याविषयी बोलताना नांदगाव हायस्कूलचे पर्यवेक्षक उत्तमराव वाघमोडे यांनी सांगितले की, जर पोस्ट खात्याचे वारंवार नेट जात असेल तर त्यांनी दुसरी प्रभावी यंत्रणा वापरून ग्राहकांना सेवा दिली पाहिजे. मुरूड पोस्ट कार्यालयातील नेट वारंवार गायब होणे ही चिंताजनक बाब आहे. एका ग्राहकाने तर मी मागील अनेक दिवसांपासून माझे कायम ठेवमधील पैसे काढण्यास जात आहे, मात्र नेट नसल्यामुळे मला अनेक वेळा रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याची नाराजी व्यक्त केली. मुरूड तालुक्यातील असंख्य ग्राहकांनी मागणी केली आहे की, मुरुड पोस्ट कार्यालयाने प्रभावी नेट सेवा अमलात आणावी व ग्राहकांना उत्तम प्रकारची सेवा द्यावी.