पनवेल : वार्ताहर – पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोविड केअर सेंटरबरोबरच सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचे काम करणार्या स्वच्छताविषयक कर्मचार्यांना कोविड भत्ता देण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात भाजप नगरसेविका सीता पाटील यांनी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे मागणी केली आहे. त्यांना या आशयाचे पत्र नगरसेविका पाटील यांनी दिले आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत चालले आहे. दरम्यान, डॉक्टर, परिचारिका, पोलीस यांच्याबरोबरच महापालिकेचे स्वच्छता विषयक कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून गेल्या मार्च महिन्यापासून अखंडितपणे सेवा देत आहेत. काही कर्मचारी हे इंडियाबुल्स, देवांशी इन, टिआरा हॉल येथील कोविड केअर सेंटरमध्ये काम करीत आहेत. काहींना ही सेवा देत असताना कोरोनाची बाधा झालेली आहे. स्वच्छतेबरोबर रुग्णांना उचलून घेऊन जाणे, त्यांना वेगळ्या प्रकारची मदत करण्याचे काम आपले स्वच्छता दूत करीत आहेत. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे काम ही मंडळी करीत आहेत. घंटागाडी कामगार घरोघरी जाऊन कचरा संकलित करीत आहेत. कोरोनाविषाणू बाधित क्षेत्रात अखंडितपणे ही सेवा सुरू आहे. दरम्यान या वैश्विक संकटात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता विषयक कर्मचार्यांचे योगदान विसरून चालणार नाही.
स्वतःचा जीव धोक्यात घालून हे कर्मचारी हे काम करीत आहे. त्यांना प्रोत्साहन म्हणून कोविड भत्ता देण्यात यावा अशी मागणी या अगोदरच करण्यात आलेली आहे. प्रशासनाकडून याबाबत शब्दही देण्यात आलेला होता, असे नगरसेविका सीता पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. परंतु अद्यापही हा भत्ता या कर्मचार्यांना देण्यात आलेला नाही. तरी प्राधिकृत अधिकारी म्हणून पण आपण या विषयी सकारात्मक विचार करावा आणि महापालिकेच्या स्वच्छता दुतांना कोविड भत्ता देण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलावीत अशी मागणी नगरसेविका पाटील यांनी केली आहे.