Sunday , June 4 2023
Breaking News

महिलांना समान अधिकार मिळाले पाहिजेत -डॉ. पद्मश्री बैनाडे

अलिबाग : प्रतिनिधी

महिला दुर्बल असल्यामुळे त्यांना आरक्षण दिले जाते. महिलांना आरक्षण नव्हे तर समान अधिकार मिळाले पाहिजेत.  ते मिळवण्यासाठी महिलांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन  रायगडच्या निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी गुरुवारी (दि. 7) येथे केले.

अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने दिल्या जाणार्‍या तेजस्विनी पुरस्कारांचे गुरुवारी वेश्वी येथील पिएनपी एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात वितरण करण्यात आले. यावेळी निवासी जिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे बोलत होत्या.

मतिमंद मुलांसाठी शाळा चालविणार्‍या डॉ. सुरेखा पाटील, महिलांसाठी पतसंस्था सुरु करणार्‍या मानसी कर्वे, महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्रामिण भागातील महिलांना आत्मनिर्भर करणार्‍या सुप्रिया नाईक, उदयोन्मुख गायिका भारती मढवी आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत असणार्‍या पुजा साठेलकर यांचा या वेळी तेजस्विनी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

आता युग बदलतयं. स्त्रिया सर्वच क्षेत्रात पुढे आहेत. मुली जबाबदारी स्वीकारत आहेत. मात्र अतंर्गत हेवेदावे आणि द्वेष महिलांच्या प्रगतीला बाधक ठरत आहेत. त्यामुळे महिलांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे, असे डॉ. बैनाडे म्हणाल्या.

असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर यांनी प्रास्ताविक केले. स्त्री आणि पुरुष ही संसाराची दोन चाके  आहेत. त्यात ताळमेळ असणे गरजेच आहे. कौटुंबिक वातावरण चांगले असेल तर महिलांची प्रगती नक्कीच होते, असे मत  विश्वास प्रांताधिकारी शारदा पोवार यांनी व्यक्त केले. काम सगळेच करतात. पण कौतुक करणारे थोडे असतात. कौतुकाची थाप जेव्हा पाठीवर पडते तेव्हा चांगले काम करण्याची उभारी मिळते, त्यामुळे आज वितरीत होणारे पुरस्कार इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरतील, असे निवडणूक अधिकारी वैषाली माने म्हणाल्या. सुत्रसंचालन महेश पोरे यांनी केले. निखील म्हात्रे यांनी आभार मानले.

Check Also

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …

Leave a Reply