नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
जो जमिनीशी जोडलेला असतो तो कोणत्याही संकटाचा सामना अत्यंत प्रभावीपणे करू शकतो. आपल्या देशातील शेतकरी हे याचेच उत्तम उदाहरण आहे. देशातील शेतकर्यांनी कोरोनाच्या संकटकाळात पाय जमिनीवर घट्ट रोवून या संकटाला तोंड दिले आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारत संकल्पनेचा कणा आपल्या देशातील शेतकरीच आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. रविवारी (दि. 27) आपल्या मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. शेती क्षेत्रात अनेक नवे बदल होत आहेत. या बदलांची चर्चा माझ्याशी शेतकरी संघटना करीत असतात. कोरोना काळात शेतकरी ज्या पद्धतीने संकटाचा सामना करीत आहेत त्याचे उदाहरण एक आदर्श आहे, असेही पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. कोरोना काळात संपूर्ण जग नव्या आव्हानांना तोंड देत आहे. कोरोना काळाचा एक फायदाही झाला आहे की अनेक कुटुंबे एकत्र आली, मात्र आता सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. लोकांना जास्त काळ घरात राहणे कठीण होत आहे, मात्र हल्लीच्या काळात कुटुंब पद्धतीही बदलली आहे. घरात ज्येष्ठ माणसे नसल्याने गोष्टी सांगण्यास कुणी नाही. तसेच मिळालेला वेळ आपण कसा घालवायचा, हा प्रश्न अनेक कुटुंबांपुढे उभा ठाकला आहे. हितोपदेश व पंचतंत्रांची परंपरा असलेला आपला देश आहे. धार्मिक कथा सांगण्याचीही देशाला परंपरा आहे. आपल्याकडे विविध धार्मिक कथा प्रसिद्ध आहेत. मन की बात या कार्यक्रमात स्टोरी टेलिंगच्या सदस्यांनी तेनाली रामा व कृष्णदेवराय यांची गोष्टही सांगितली. देशातील नागरिकांनी दर आठवड्याला गोष्टी, कथांसाठी वेळ काढावा, असेही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 2 ऑक्टोबर आपल्या सर्वांसाठी प्रेरक दिवस असतो. हा दिवस महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. गांधीजींचे विचार आणि आदर्श आज पहिल्यापेक्षी कितीतरी अधिक प्रासंगिक आहेत. महात्मा गांधींचे आर्थिक विचार आणि त्या चेतनेला पकडले गेले असते, समजले गेले असते, त्या मार्गावर चालले गेले असते, तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरजच पडली नसती. तसेच गांधीजींच्या आर्थिक विचारांत भारताचा सुगंध होता. महात्मा गांधींचे जीवन आपल्याला याची आठवण करून देते की आपण हे सुनिश्चित करावे की आपले प्रत्येक कार्य असे असावे ज्यामुळे गरिबातील गरीब व्यक्तीचे भलं व्हावे, तर शास्त्रीजींचे जीवन आपल्याला विनम्रता व साधेपणाचा संदेश देते, असेदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी अधोरेखित केले.