विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी
महाड : प्रतिनिधी
महाड इमारत दुर्घटनेतील कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांना दिले आहे. त्याचप्रमाणे महाड ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत कोविड-19 रुग्णांसाठी वापरण्याकरिता दुरुस्ती प्रस्तावास तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही दरेकर यांनी केली आहे.
महाड येथील तारिक गार्डन नावाची पाच मजली इमारत 24 ऑगस्ट रोजी कोसळली. या दुर्घटनेत 16 जणांना आपले प्राण गमावावे लागले, तर इमारतीत राहणारी 47 कुटुंब बेघर झाली आहेत. राज्य शासनाने या दुर्घटनेतील बेघर कुटुंबीयांचे तातडीने पुनर्वसन करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. या घटनेची चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे, मात्र या चौकशीसोबतच बेघर कुटुंबीयांचा विषयही तितकाच महत्त्वाचा आहे,
कारण स्वतः नवीन घर बांधण्याची आर्थिक क्षमता या लोकांकडे नाही. त्यामुळे शासनाने त्यांचे पुनर्वसन करावे, असे दरेकर यांनी म्हटले आहे.
महाड ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत दुरुस्तीसाठी निधी द्या
यासोबतच महाड ग्रामीण रुग्णालयाची इमारत कोविड केअर सेंटर म्हणून वापरण्यासाठी तिची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या दुरुस्तीसाठी राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांना दिले आहे. महाड ग्रामीण रुग्णालयात अद्ययावत कोविड सेंटर सुरू झाल्यास या फायदा महाड, पोलादपूर, मंडणगड, दापोली, खेड या तालुक्यांतील गरीब आणि गरजू रुग्णांना होणार आहे, असे दरेकर यांनी पत्रात नमूद केले आहे.