मराठा क्रांती मोर्चाचे तहसीलदारांना निवेदन; आंदोलनाचा इशारा
मुरूड ः प्रतिनिधी
मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात असताना शासनाकडून पोलीस भरतीचा घाट घातला जात आहे. हा सरळसरळ मराठा समाजावर अन्याय आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत शासनाने कोणतीही भरती करू नये. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा विषय घटनापीठाकडे देताना स्थगिती आदेश दिला. मुख्यमंत्र्यांनी घटनातज्ज्ञांचा सल्ला घेऊन ही स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा 5 ऑक्टोबरला आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मुरूड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे. या संदर्भात मुरूडचे तहसीलदार गमन गावित यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
या वेळी दत्तात्रेय भोसले, राजन मानकर, वसंत गायकर, विजय सुर्वे, भरत बेलोसे, सुनील चाळके, अशोक चाळके, दर्शना शिर्के, सुवर्णा पवार, वसुंदा गायकर, शालिनी दळवी, रूषीला पतने, स्मिता पतने, वर्षा धनावडे, लीलावती घाग आदी उपस्थित होते.
प्रथम मुरूड शहरातील दत्तवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दत्तात्रेय भोसले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, एक मराठा, लाख मराठा अशी घोषणा देण्यात आल्या.
मराठी क्रांती मोर्चाचे पदाधिकारी सोशल डिस्टन्स पाळून मुरूड तहसील कार्यालयाच्या प्रांगणांत जमले होते.