पनवेल : वार्ताहर
पनवेल शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत. परिणामी या परिसरातील नागरिक चोरांच्या दहशतीमुळे भयभीत झाले आहेत. पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनांच्या वाढत्या तक्रारी बघता नागरिकांमध्ये सतर्कतेविषयी जनजागृती करणे गरजेचे झाले आहे. तसेच अशा चोरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करणे हेदेखील आवश्यक आहे.
शहरातील ओएनजीसी उसर्ली खुर्द येथे राजू मढवी यांनी त्यांची 30 हजार रुपये किंमतीची होंडा कंपनीची हॉरनेट मोटरसायकल (क्र.एमएच-06-बीएक्स-2911) करड्या रंगाची ही ओएनजीसी परिसरात उभी करून ठेवली होती. या वेळी अज्ञात चोरट्यांनी ही मोटरसायकल चोरली. कोळी समाज मंदिर करंजाडे सेक्टर आर 3 या ठिकाणी 30 हजार रुपये किंमतीच्या दोन फूट बाय तीन फूट लांबीच्या 150 लोखंडी प्लेट चोरली आहे. रेल्वे ब्रीज भिंगारी गाव आजूबाजूच्या ठिकाणी साईडवर काम सुरू असल्याने विविध प्रकारचे पाईप, पॅनल, चॅनल व इतर वस्तू असा मिळून 54 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज चोरी झाला आहे. कोळखे गावात राहणारे हिरामण दोरे यांच्या घराच्या खिडकीचे ग्रील तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मिळून जवळपास एक लाख 37 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरला. या सर्व चोरीच्या घटनांची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
लार्सन अॅण्ड ट्युब्रो या कंपनीचे तळोजा सेक्टर 39 शालीमार हॉटेल समोर मा. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरांचे बांधकाम सुरू आहे. या साईडवर मोकळ्या जागेत तीन लाख 44 हजार रुपये किंमतीचे अॅल्युमिनियम पॅनलचे अंदाजे 206 सुटे भाग वेगवेगळ्या आकाराचे एकूण अंदाजे 2100 किलो वजनाचे सिल्व्हर रंगाचे पॅनल चोरले आहे. रोहिंजण येथे अधिराज कंन्स्ट्रक्शन प्रा.लि. यांचे बांधकामाचे प्रोजेक्ट या कार्यालयामध्ये असलेला एचपी कंपनीचा 25 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप अज्ञात चोरी झाला आहे. या घटनांच्या तक्रारी तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहे.
पल्लवी पंडित (रा.कामोठे वसाहत) यांच्या घरातील दरवाजा उघडून त्यांचा व त्यांच्यासह त्यांच्या मैत्रीणीचा असे तीन मोबाइल (किंमत जवळपास 22 हजार रुपये) चोरी झाले आहेत. याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
चेन स्नॅचिंग घटनांत वाढ
खारघरमध्ये दोन दिवसात दोन चेन स्नॅचींगच्या घटना घडल्या असून या दोन्ही घटनेत लुटारुंनी सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचे दागिने लुटून नेले आहेत. खारघर पोलिसांनी या दोन्ही घटनेतील आरोपींविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच कामोठ वसाहतीतील एका महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत 60 हजार रुपये) जबरदस्तीने खेचून स्कुटीवरून आरोपी पसार झाले. याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
कळंबोलीत पोलिसांचा बंदोबस्त
कळंबोली : शहरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ बुधवारी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. कामोठे परिसरात सोनसाखळी चोरीची घटना घडल्याने कळंबोली पोलिसांनी हा बंदोबस्त लावला होता. यावेळी ये जा करणार्या प्रत्येक वाहनांची चौकशी करण्यात येत होती. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील, बच्छाव व त्यांचे इतर सहकारी उपस्थित होते.
लोखंडी चॅनेल चोरणारे त्रिकुट गजाआड
शहरातील लेबर कॅम्प विरुपाक्ष हॉलच्या बाजूला पनवेल येथे सुरू असलेल्या काँक्रीट रोडच्या कामाच्या ठिकाणावरून दोन लाख 90 हजार रुपयांचे 14 लोखंडी चॅनेल चोरल्याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी तीन आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. हरुण लाला सय्यद (वय 24), इब्राहिम साहेब शेख (वय 30, दोन्ही रा. नवनाथनगर झोपडपट्टी, पनवेल), दिलशेर शाहा मोहम्मद खान (वय 35, रा. उसर्ली खुर्द पनवेल) अशी आरोपींची नावे आहेत.