नारीशक्तीचे पोलिसांना निवेदन
कर्जत ः बातमीदार
कर्जत शहरात राजरोजपणे मटका-जुगार तसेच अवैध दारूविक्री सुरू आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करून असे अवैध धंदे बंद झालेच पाहिजेत, अशी मागणी महिला नारीशक्ती संघटनेने केली आहे. त्याबाबतचे निवेदन नारीशक्ती महिला संघटनेच्या वतीने कर्जत पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.
कर्जत शहरात महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांनी नारीशक्ती हे संघटन उभे केले आहे. या संघटनेच्या माध्यमातून कर्जत शहरातील अनेक सामाजिक प्रश्न हातात घेऊन नारीशक्ती कायम आवाज उठवत आहे. नारीशक्ती संघटनेकडे कर्जत शहरातील अनेक महिलांनी आपल्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाला मटका आणि जुगाराने वेढले असून संसार उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे कर्जत शहरात सुरू असलेले मटका आणि जुगाराचे अनधिकृत धंदे बंद करण्यासाठी मोहीम उघडण्याची मागणी केली होती. त्यानुसार नारीशक्तीच्या वतीने कर्जत शहरात असलेल्या अनधिकृत धंद्यांबाबत माहिती घेतली असता अनेक ठिकाणी मटका आणि जुगाराचे अड्डे सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यात कर्जत शहरातील पाटील आळी, खाटीक आळी अशा दोन ठिकाणी, तर फातिमानगर भिसेगाव, गुंडगे आणि दहिवलीमध्ये काही ठिकाणी खुलेआम मटका-जुगार खेळला जात आहे. याबाबत पोलिसांना अनेकांनी निवेदने देऊनदेखील त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही.
मटका चालविणार्यांना पोलिसांचा धाक राहिला नाही. पोलिसांनी कारवाई केल्यास फक्त एक महिना मटका-जुगार बंद ठेवायचा आणि ठिकाण बदलून हे व्यवसाय पुन्हा सुरू होतात. परिणामी मटका- जुगार खेळण्याच्या जी तरुण पिढी आहारी गेली आहे त्यांचे आयुष्य बरबाद होत आहे. झटपट पैसा कामाविण्याच्या नादात ही तरुण पिढी भरकटत आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत.
हे रोखण्यासाठी महिला नारीशक्ती संघटनेने आवाज उठविला आहे. अवैधरीत्या चालणारे मटका-जुगाराचे अड्डे कायमचे बंद करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, या मागणीचे निवेदन घेऊन नारीशक्ती संघटना कर्जत पोलीस ठाण्यात पोहचली. या वेळी नारीशक्ती संघटनेच्या स्वीटी बार्शी, सुप्रिया मोरे, अर्चना हगवणे, ज्योती जाधव, कमल जाधव, वर्षा डेरवणकर, आशा गाडे, मालती वाडगावकर, सीताराम गाडे आदी महिला उपस्थित होत्या.