चंद्रकांत पाटील यांची घणाघाती टीका
पुणे ः प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करून मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. त्यांचा हा पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार त्यांना निश्चितच महागात पडणार आहे. आता तरी सत्तेचा माज सोडून मराठा तरुणांच्या भविष्याचा विचार करा; अन्यथा मराठा रस्त्यावर उतरला की इतिहास घडतो, हे देशाने पाहिले आहे, अशा शब्दांमध्ये पाटील यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.
पाटील यांनी म्हटले की, 2020-21 या शैक्षिणक वर्षातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे नोटिफिकेशन 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. याशिवाय मराठा आरक्षण ईडब्लूएस अंतर्गत देण्याचे आश्वासनदेखील दिले होते, मात्र या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी एससीबीसी प्रवर्गाचा साधा उल्लेखसुद्धा केला नाही आणि इतर आरक्षित असलेल्या सर्व प्रवर्गांचा उल्लेख करण्यात आला ही धक्कादायक बाब आहे. राज्य सरकारच्या या धोरणांमुळे यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचेच नाही हे सिद्ध होतेय.