लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे घेतले आशीर्वाद
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने इतिहास घडवत एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यानंतर येथील प्रतिष्ठेच्या सभापतीपदासाठी रंजना सदाशिव वास्कर यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले असून त्यांनी मंगळवारी (दि.10) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेत आशीर्वाद घेतले.
भाजप महायुतीने पनवेल पंचायत समितीच्या 16पैकी तब्बल 15 जागांवर दणदणीत विजय साकारून शेकापप्रणित महाविकास आघाडीची मक्तेदारी मोडित काढली. ग्रामीण भागात प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपने मिळविलेले हे घवघवीत यश विशेष असेच आहे. यावेळेस येथील सभापतीपद महिला खुला प्रवर्गासाठी राखीव असल्याने आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी सभापतीपदासाठी रंजना वास्कर यांची तसेच उपसभापतीपदासाठी भूपेंद्र पाटील यांची नावे निश्चित केली आहेत. रंजना वास्कर या भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या कन्या असून कुंडेवहाळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सदाशिव वास्कर यांच्या पत्नी आहेत. त्या करंजाडे गणातून निवडून आल्या आहेत.
सभापती आणि उपसभापतीपदासाठी बुधवारी (दि.11) सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान पनवेल पंचायत समितीमध्ये अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. दुपारी 2 वाजता निवडीसाठी बैठक होईल, तर त्यानंतर 3 वाजता वाजतगाजत विजयी मिरवणूक निघणार आहे. यावेळी सर्वप्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन, पुढे भाजप मध्यवर्ती कार्यालय येथून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळाच्या सभागृहात नवनिर्वाचित सभापती, उपसभापतींसह सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर रंजना वास्कर आणि भूपेंद्र पाटील यांनी मंगळवारी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, पं.स. सदस्य अंकुश खैर, युवा मोर्चा पळस्पे विभागीय अध्यक्ष योगेश लहाने, विचुंबेचे सरपंच प्रमोद भिंगारकर, सचिन केवारे, कुणाल काठे आदी उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रंजना वास्कर आणि भूपेंद्र पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper