Breaking News

पनवेल पंचायत समितीवर भाजपचे कमळ

  • सभापतीपदी रंजना वास्कर तर उपसभापतीपदी भूपेंद्र पाटील
  • लाल बावट्याच्या वर्चस्वाला पूर्णविराम

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुका पंचायत समितीच्या राजकारणात ऐतिहासिक बदल घडला असून पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचे कमळ या समितीवर फुलले आहे. भाजपच्या वतीने करंजाडे गणातून निवडून आलेल्या रंजना सदाशिव वास्कर सभापतीपदी तर आदई गणातून निवडून आलेले भूपेंद्र सदानंद पाटील हे उपसभापती विराजमान झाले आहेत. अनेक दशकांपासून पंचायत समितीवर असलेला शेतकरी कामगार पक्षाचा एकछत्री अंमल आता संपुष्टात आली आहे.
या निवडीनंतर घोषणा, ढोलताशा आणि फटाक्यांच्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. विजय अद्भुतपूर्व असला तरी या विजयी जल्लोषात विनम्रपणा स्पष्टपणे जाणवत होता. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, महापौर नितीन पाटील, माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर, युवा नेते प्रितम म्हात्रे यांच्यासह इतर नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी सभापती, उपसभापती यांचे अभिनंदन केले. त्यानंतर मार्केट यार्ड येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
पनवेल आणि रायगड परिसरात शेतकरी कामगार पक्षाचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले होते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत या पक्षाचे लोकप्रतिनिधी सातत्याने निवडून येत होते, मात्र 2009 नंतर या वर्चस्वाला हळूहळू उतरती कळा लागली. सर्वप्रथम पनवेल नगर परिषदेत शेकापला धक्का बसला, त्यानंतर विधानसभा निवडणुकांमध्येही पराभवाचा सामना करावा लागला. त्याच काळात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने या मतदारसंघासोबत रायगड जिल्ह्यात मजबूत पकड निर्माण केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सलग चार टर्म आमदार म्हणून नेतृत्व करताना राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली. पनवेल महानगरपालिकेतही भाजपने सलग दुसर्‍यांदा एकहाती सत्ता प्रस्थापित केली.
शहरात भाजपची सत्ता असली तरी ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकत होता, मात्र 2017 नंतर ग्रामीण भागातही भाजपचा प्रभाव वाढू लागला. त्याचे स्पष्ट चित्र नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दिसून आले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, युवा नेते परेश ठाकूर व प्रितम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात आली. पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकीत शेकापला एकही सदस्य निवडून आणता आला नाही. भाजपने 16 पैकी तब्बल 15 सदस्य निवडून आणत शेकापचा अक्षरशः व्हाईट वॉश केला.
सभापती पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे भाजपने करंजाडे गणातून विजयी झालेल्या रंजना वास्कर यांच्यावर विश्वास दाखवला आहे. त्या भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या कन्या असून अरुणशेठ भगत यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा बाळकडू त्यांना मिळाला आहे. त्याचबरोबरीने त्यांचे पती सदाशिव वास्कर यांनी कुंडेवहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची छापसुद्धा त्यांच्यावर आहे. उपसभापतीपदी निवड झालेले युवा नेते भूपेंद्र पाटील यांनी मागील टर्ममध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून सक्षम व प्रभावी काम केले आहे. जनसंपर्काची उत्तम जाण आणि युवा संघटनाची मजबूत पकड ही त्यांच्या कार्याची जमेची बाजू मानली जाते.
गेल्या अनेक पंचवार्षिक निवडणुकांमध्ये पनवेल पंचायत समितीवर शेकापचा झेंडा फडकत होता आणि इतर पक्षांसाठी येथे विजय मिळवणे अत्यंत कठीण मानले जात होते, मात्र 2026च्या निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने हे समीकरण पूर्णपणे बदलून टाकले आहे. त्यामुळे पनवेलच्या ग्रामीण राजकारणात लाल बावट्याचा अध्याय संपून भाजपचा नवा अध्याय सुरू झाला असून त्या अनुषंगाने पनवेल पंचायत समितीच्या माध्यमातून तळागाळात विकास पोहोचविण्याचा मार्ग सुकर झाला आहे.


पंचायत समितीमध्ये सत्ता यावी हि अनेक वर्षांची ईच्छा होती, ती पूर्ण झाली. या अनुषंगाने नागरिकांचे काम जलदगतीने आणि योग्यप्रकारे होणार आहेत. या विजयात प्रत्येक कार्यकर्त्याचा सहभाग आहे. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!
-लोकनेते रामशेठ ठाकूर

गेली 20 वर्षे अरुणशेठ भगत तळमळीने काम करत आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदुःखात धावणारे ते नेते आहेत. त्यामुळे या विजयात त्यांचा मोठा वाटा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण कार्यकर्त्याच्या पाठीशी कायम उभे राहिले आहेत. एवढा मोठा आपण विजय मिळवला असला तरी आपण विनम्र आहोत. 16 पैकी 15 जागा जिंकून अभूतपूर्व यश मिळवले असले तरी पुढच्या वेळी 100 टक्के जागा जिंकायच्या आहेत. महायुतीमधील घटक पक्ष आणि कार्यकर्ते, मतदार, नागरिकांचे आभार!
-आमदार प्रशांत ठाकूर

अनेक वर्षांची प्रतिक्षा होती ती पूर्ण झाली आहे. आजचा हा सोहळा आपल्यास सर्वांसाठी अभिमानाचा आहे. जबाबदारी वाढली आहे ती तुम्ही पारदर्शकपणे पार पद. विकासाचे चक्र चालू ठेऊ या.
-आमदार महेश बालदी

कार्यकर्त्यांचा उर अभिमानाने भरून आणणारा आजचा दिवस आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार अरुणशेठ भगत आहेत. प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणारे अरुणशेठ भगत असे व्यक्तिमत्व आहे. अनेक वर्षाच्या मेहनतीला यश आले आहे.
-अविनाश कोळी

इतिहासात लिहिला जाणारा क्षण आहे. शेकाप शेकाप चालत आला यापुढे भाजप भाजप भाजप सत्ता कायम राहणार आहे.
-प्रितम म्हात्रे, युवा नेते

Check Also

वॉरियर्स क्लबच्या प्रशिक्षणार्थींनी घेतली लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट

उलवे नोड : रामप्रहर वृत्तउलवे नोडमध्ये वॉरियर्स क्लब अंतर्गत शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रशिक्षण घेत असलेल्या …

Leave a Reply