Breaking News

लक्षवेधी मराठी सिनेतारका

मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अनेक नायिका लक्षवेधक ठरल्या. त्यातीलच काही नायिकावर हा 8 मार्च या महिला दिनानिमित्त विशेष फोकस….
काही नायिकांच्या अतिशय लोकप्रिय भूमिकांची मुळे फ्लॅशबॅकमध्ये जात पाहिलं तर नेमकी कुठे असतील हे सांगता येत नाही हेच खरे. नायिका या गोष्टीतील हा फंडा अगदीच वेगळा. शांता आपटे या महाराष्ट्रीय नायिकेची वाटचाल काळाच्या खूपच पुढची होती. आज एका भाषेतील कलाकार अन्य भाषेतील चित्रपटात व्यावसायिक रणनीतीनुसार भूमिका साकारतात. शांता आपटे या चाळीसच्या दशकातच मराठीतून हिंदीत गेल्या. विशेष उल्लेखनीय गोष्ट मराठी चित्रपटातून हिंदीत गेलेल्या त्या पहिल्याच अभिनेत्री आहेत. आणि त्यात त्यांनी चक्क कोलकाता (तेव्हाचे कलकत्ता) येथे जाऊन स्वयंसिद्धा या चित्रपटात शीर्षक भूमिका साकारली. 1949 सालची ही गोष्ट. ही भूमिका अशी व इतकी लोकप्रिय झाली की त्यानंतर 1961 साली माला सिन्हाने बहुरानी या चित्रपटात, हेमा मालिनीने 1981 साली ज्योती या चित्रपटात आणि 1992 साली माधुरी दीक्षितने बेटा या चित्रपटात तीच व्यक्तिरेखा साकारलीय. या सगळ्यात पहिल्यांदा भूमिका साकारली ती शांता आपटे यांनी आणि एका नायिकेच्या भूमिकेचा प्रवास असा सुरू राहिला. दोन्ही नायिकांचे प्रत्यक्षातील वय एकसारखेच आहे, पण एखाद्या चित्रपटात एका नायिकेने दुसर्‍या नायिकेच्या चक्क आईची भूमिका साकारलीय असेही घडलयं. नायिका नायिका यात ही गोष्ट काही वेगळीच. दादासाहेब फाळके दिग्दर्शित गंगावतरण या 1937 सालच्या चित्रपटाच्या वेळेस तसे घडले. शांता हुबळीकर यांचा हा पहिलाच चित्रपट. या चित्रपटाच्या वेळेस त्यांचे वय होते अवघे पंधरा आणि याच वयात त्यांनी या चित्रपटात त्यांच्याच वयाच्या असलेल्या लीला चंद्रगिरी यांच्या आईची भूमिका साकारलीय. त्या काळात कसलेही आढेवेढे न घेता अनेक कलाकार चित्रपटातून भूमिका साकारत. नायिका गोष्टीत काही एकदम वेगळेच. ही गोष्ट 1930 सालची. दिग्दर्शक एम. भवनानी यांनी फरेबी जाल हा दोन नायिका असलेला चित्रपट निर्माण करण्याचे पाऊल टाकले. या चित्रपटातील एक नायिका म्हणून आपली पत्नी इनाक्षी रामाराव यांची निवड केली. त्या एम. ए.ची पदवी प्राप्त होत्या. त्या काळात पदवीधर ही सामाजिकदृष्ट्या खूपच मोठी गोष्ट. आता त्यांच्यासोबतची दुसरी नायिकादेखिल तशीच सुशिक्षित हवी असे एम. भवनानी यांना वाटले. त्यांनी त्यासाठी दुर्गा खोटे यांच्या मोठ्या बहिणीची निवड करण्याचे ठरवले, पण त्यांना नाटकात, मूकपटात रस नव्हता म्हणून त्यांनी दुर्गा खोटे यांचे नाव सुचवले. दुर्गा खोटे यांनी होकार दिला आणि या दोन नायिका असलेल्या मूकपटाचे चित्रीकरण सुरू झाले आणि हा चित्रपट पूर्ण व्हायच्या आतच आपल्याकडील चित्रपट बोलू लागला. आता काय करायचे? तर त्यानंतरचे चित्रीकरण बोलक्या दृश्यांचे करण्यात आले. त्यामुळेच हा चित्रपट पाहताना अधूनमधून तो बोलू लागे. त्या काळात ते मनोरंजक ठरले. या चित्रपटात दुर्गा खोटे यांनी सहज औपचारिकता म्हणून काम केले होते, पण आता त्यांनी याच क्षेत्रात करिअर करायचे ठरवले.
दिग्दर्शक एम. भवनानी हे दोन नायिका असलेल्या चित्रपटाच्या कथा रुपेरी पडद्यावर आणत आणि त्यात एक नायिका त्यांची पत्नी इनाक्षी रामाराव या साकारत. त्या एमए पदवीधारक होत्या. 1931 साली एम. भवनानी यांनी वसंतसेना या चित्रपटाची निर्मिती करताना त्यात दुसरी नायिका म्हणून नलिनी तर्खंड यांची निवड केली. त्या बीए पदवीधारक होत्या. विशेष उल्लेखनीय गोष्ट, या चित्रपटाच्या जाहिरातीत या दोन्ही नायिकांच्या पदवीचा आवर्जून उल्लेख केला जाई.
एकाच वेळेस मराठी व हिंदी भाषेत चित्रपट निर्माण करण्याची पद्धत खूपच जुनी. चित्रपती व्ही.शांताराम दिग्दर्शित असे काही चित्रपट चाळीसच्या दशकातच रुपेरी पडद्यावर आले. त्यांचा एक चित्रपट होता, शेजारी. साल 1941. हा चित्रपट त्यांनी मराठीत शेजारी व हिंदीत पडोसी या नावाने दिग्दर्शित केला. शेजारी या चित्रपटात जयश्री (कामुलकर) या नायिका होत्या आणि या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या काळातच व्ही. शांताराम व जयश्री यांचे नातेसंबंध दृढ झाले आणि त्यांनी विवाह केला, पण जयश्री या महाराष्ट्रीय कुटुंबात वाढल्याने त्यांना हिंदीत बोलणे कितपत जमेल अशी प्रभात फिल्म कंपनीत काहींनी शंका व्यक्त केल्याने ’पडोसी’ची नायिका म्हणून अनिस खातूनची निवड केली. एक गोष्ट, दोन भाषेतील चित्रपट पण दोन भिन्न नायिका असे झाले. तसे असले तरी शेजारी या चित्रपटात त्यांनी साकारलेले लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया हे गाणे आजही लोकप्रिय आहे. व्ही.शांताराम यांचा हा प्रभात चित्रमधील शेवटचा चित्रपट. त्यानंतर त्यांनी राजकमल कलामंदिरची स्थापना केली. हे नायिका नायिका प्रकरण वा उदाहरण अगदीच वेगळे.
मा. विनायक अभिनित व दिग्दर्शित ब्रह्मचारी या 1938च्या चित्रपटापासून त्यांची व नायिका मीनाक्षी शिरोडकर यांची रुपेरी पडद्यावर जोडी जमली. त्यानंतर मा. विनायक यांच्या ब्रॅन्डीची बाटली, देवता, अर्धांगी, अमृत, माझं बाळ, गजाभाऊ या चित्रपटात मीनाक्षी शिरोडकर नायिका होत्या. त्या काळात खूपच एकोप्याने चित्रपट निर्मिती होत असे आणि त्यात नातेसंबंध दृढ होत, पण ते किती व्हावेत? पहिली मंगळागौर या चित्रपटाचे दिग्दर्शन मा. विनायक करीत होते आणि स्नेहप्रभा प्रधान या चित्रपटात नायिका होत्या. स्नेहप्रभा प्रधान यांनी एखादे दृश्य दिल्यावर मा. विनायक त्यांना हे दृश्य मीनाक्षी शिरोडकर यांनी कसे दिले असते हे सांगत. हे सतत होत राहिले आणि मग मा. विनायक यांनीच निर्णय घेऊन आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन सोडले. आणि मग र.शं. जुन्नरकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला. विशेष उल्लेखनीय गोष्ट, या चित्रपटात लता मंगेशकर यांनी मराठी चित्रपटासाठी गायलेल्या पहिल्या गाण्याचा नटली चैत्राची नवलाई या गाण्याचा समावेश आहे. पडद्यावरही लता मंगेशकर यांनीच हे गाणे साकारलयं. त्यांची भूमिका छोटीशीच आहे.1942 सालची ही गोष्ट.
मा. विनायक आणि मीनाक्षी शिरोडकर ही नायक नायिका जोडी अन्य दिग्दर्शकांच्या चित्रपटातही होती. त्यात एक चित्रपट होता, आचार्य अत्रे यांच्या नवयुग पिक्चर्स निर्मिती व नारायण काळे दिग्दर्शित लपंडाव ( 1940) आणि या चित्रपटात मीनाक्षी शिरोडकर व वनमाला अशा दोन नायिका होत्या, पण गंमत अशी की, ब्रह्मचारी चित्रपटाच्या यशानंतर महाराष्ट्रीय कुटुंबात मुलीचे नाव मीनाक्षी असे ठेवण्याचे युग आले. हे नाव इतके लोकप्रिय झाले की कोलकत्याच्या न्यू थिएटर्स या चित्रपट निर्मिती संस्थेने आपल्या एका चित्रपटाचे नाव मीनाक्षी असे ठेवले. ब्रह्मचारी चित्रपट 1938 साली पडद्यावर आला तर मीनाक्षी चित्रपट 1942 साली. असा हा नावाचा प्रभाव होता. या चित्रपटात नायिका साधना बोस हिचे नाव मीनाक्षी असते. लपंडाव चित्रपटात मीनाक्षी शिरोडकर यांच्यासोबतच दुसरी नायिका असलेल्या वनमाला यांचा हा पहिलाच चित्रपट. यात पुन्हा आणखी एक गंमत आहे, मीनाक्षी शिरोडकर यांचे मूळ नाव रतन. हंस पिक्चर्सने ते त्यांना दिले तर वनमाला यांचे खरे नाव सुशीला. विशेष उल्लेखनीय गोष्ट आचार्य अत्रे पुण्यातील आगरकर हायस्कूलमध्ये प्राध्यापक असतानाच त्यांना सुशीला यांच्यात अभिनेत्री होण्याचे गुण ओळखले. लपंडाव या चित्रपटाची कथा लिहीत असतानाच त्यांच्या लक्षात आले होते मा. विनायक या चित्रपटाचे नायक असल्याने मीनाक्षी शिरोडकर यात एक नायिका निश्चित असणार. दुसरी नायिका महाविद्यालयात जाणारी दाखवलीय ती सुशीला अर्थात वनमाला असावी हे अत्रे यांनीच मा. विनायक यांना सुचवले आणि अशा पद्धतीने एका चित्रपटात दोन नायिका एकत्र आल्या. त्या निवडीमागची कारणे आवडीनिवडीत आहेत असे म्हणायचे काय? नाते आई व मुलीचे असले तरी मनोरंजन क्षेत्रात त्या दोन नायिकाच. आई नायिका असल्यानेच मुलीला चांगल्या टीप्स आपोआपच मिळतात. आणि तीदेखील नायिका म्हणून वावरताना काळजी घेतेच.
शुभांगी गोखले यांची लेक सखी गोखले ही एक अशीच परिचित जोडी. सखी विविध मुद्द्यांवर आपलं परखड मत मांडत असते. सखीने आपल्या आईच्या स्वभावाविषयी एका मुलाखतीत भाष्य केलं.. माझ्याकडून काही मोठ्या चुका केल्या. तेव्हा त्याचा मला पश्चाताप नाही झाला. या चुकांवेळी माझी आई माझी मैत्रीण झाली. तिने त्या चुकांवर रागावली नाही, असं सखीने सांगितलं.जेव्हा अशा मोठ्या चुका झाल्या तेव्हा मला भीती वाटायची की आई मला रागवेल. ती खूप ओरडेल, पण अशा वेळी आईने खूप समजुतीने घेतलं. मला समजून घेतलं, असं सखीने म्हटलं. माझ्या मोठ्या चुकांवेळी आई ही माझी मैत्रिण झाली. जेव्हा मला वाटलं की मोठी चूक झालीय. यातून आता सुटका नाही, अशावेळी तिने मैत्रिणीची भूमिका घेतली. आईपेक्षा ती माझी मैत्रिण झाली, असं सखी म्हणाली. जेव्हा मी लहान-सहान चुका करते. तेव्हा मात्र आई खूप रागावते. मला एखाद्या ठिकाणी पोहचायला उशीर झाला. तर मग ती मला रागावते, असं सखीने म्हटलंय.या जोडीच्या नात्यातील हे काही पैलू. आई आणि मुलगी अशा अनेक जोड्या मनोरंजन क्षेत्रात आहेत. त्यांच्याभोवती विशेष वलयही आहे. अशीच एक जोडी सुप्रिया पिळगावकर व श्रिया पिळगावकर.
आईच्या प्रेमाला तोड नसते. आईला प्रत्येक टप्प्यावर मुलांसोबत तडजोड करावी लागते. मुल जन्माला आल्यावर, मुलं मोठी होताना, मुलं शिक्षण आणि नोकरीसाठी घराबाहेर पडतात तेव्हा, मुला-मुलींचे लग्न झाल्यावर, मुलांना मुलं झाल्यावर अशा अनेक टप्प्यावर आईची भूमिका नेहमीच बदलत जाते. अशीच एक आई रिअल आणि रिल आयुष्यात तिची भूमिका खंबीरपणे साकारताना दिसते सुप्रिया पिळगावकर. पडद्यावर आई साकारताना आणि खर्‍या आयुष्यात आईची भूमिका साकारताना कशी आहे सुप्रिया पिळगावकर आणि नायिका म्हणून त्या कसा विचार करतात आणि आपली मुलगी श्रीया हिचा मुलगी म्हणून व एक नायिका म्हणून कसा विचार करतात? कुछ रंग प्यार के ऐसे भी नई कहानी या मालिकेत सुप्रिया पिळगावकरनी आईची भूमिका साकारली. यातील ईश्वरी ही महिला वेगळ्या छटा असलेली आई आहे.
सुप्रिया पिळगावकर म्हणजे ईश्वरी सांगतात, एक आई म्हणून ईश्वरी आपल्या मुलांवर सारखेच प्रेम करते, पण आपणा सर्वांना माहीतच आहे की, देव (शहीर शेख)कडे तिचा विशेष कल आहे. आपल्या आणि आपल्या मुलाच्या नात्यात ती कोणालाच येऊ देत नाही. माझ्या मते, प्रेम आणि काळजी दाखवण्याची प्रत्येक आईची आपली खास पद्धत असते. शेवटी एका आईची इच्छा आपल्या मुलाने आनंदात असावे आणि जीवनात त्याची भरभराट व्हावी हीच तर असते. देवबद्दल ईश्वरीला हेच वाटत असते, तर श्रेयाची आई म्हणजेच खर्‍या खुर्‍या आयुष्यातील आईपणाबद्दल सुप्रिया पिळगावकर यांनी शेअर केलं, मला एक मुलगी आहे आणि तिने आई म्हणून माझी निवड केली याबद्दल मला कृतज्ञता वाटते. तिच्या बाबतीत मी खूप प्रोटेक्टिव्ह आहे. तिच्या वास्तव व व्यावसायिक जीवनात ती जे निर्णय घेते, त्यात मी तिच्यावर विश्वास ठेवते आणि तिला आधार देते. ती एक सुंदर आणि स्वतंत्र स्त्री झालेली पाहताना माझ्या मनाला खूप आनंद होतो. आपल्याला हे माहीत असते की एक ना एक दिवस आपली मुले पाखरासारखी घरट्यातून उडून जाणार आहेत, पण तरीही एका आईसाठी ती मुले नेहमीच जीवाभावाची राहतात.
चित्रपटसृष्टीत एकत्र काम करता करता वेगवेगळ्या प्रकारची नाती येथे निर्माण होतात. अशीच एक जोडी लीला गांधी आणि जयश्री गडकर या अभिनेत्रींची! कधी कधी तर लीला गांधी नृत्य दिग्दर्शक व कलाकारही आणि जयश्री गडकर कलाकार असाही योग आला. आपल्या प्रत्येकाचे काम चांगले व्हायला हवे अशी जयश्री गडकर यांची प्रामाणिक भावना आणि लीला गांधी त्यांच्या या गुणाचे कायमच कौतुक करीत. अशातच कमलाकर तोरणे दिग्दर्शित लाखात अशी देखणी या चित्रपटात लीला गांधी यांची आईची तर जयश्री गडकर त्यांच्या मुलीच्या भूमिकेत होत्या. अशी भूमिका साकारायची म्हणून लीला गांधी सुरुवातीस थोड्या घाबरलेल्या होत्या. आणि जयश्री गडकर कोणतीही भूमिका उत्तम साकारतात असे त्यांचे मत, पण आपण चित्रपटाच्या नायिका असूनही जयश्री गडकर यांनी लीला गांधी यांना सांभाळून घेतले. असे खुद्द लीला गांधी हा चित्रपट पूर्ण झाल्यावर बोलून दाखवले. छान जोडी जमल्याने असे काही सकारात्मक घडते हेच खरे.
सुषमा शिरोमणी आणि रेखा या दोघींचीही एकदा जोडी जमली. हा चित्रपट होता फटाकडी (1980). चक्क मराठी चित्रपट. या चित्रपटाची नायिका व निर्माती सुषमा शिरोमणी होती. सुषमा शिरोमणी म्हणजे मनात येईल ते तडीस नेण्याचा जबरी बाणा. तिच्या चित्रपटातील हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकाराचे फक्कडबाज नृत्य हे तर सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहातील हाऊसफुल्ल गर्दीला मनोरंजनाचा हुकमी फंडा. सुषमा निर्मित व दत्ता केशव दिग्दर्शित ’फटाकडी’साठी जगदीश खेबूडकर लिखित आवो भरल्या बाजारी धनी तुम्ही मला हेरलं… कुठं कुठं जायाचं हनिमूनला हे फक्कडबाज लावणी गीत नृत्य आशा भोसले यांच्या नटखट आवाजात संगीतकार बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केले. हे गाणे शहरापासून ग्रामीण भागातील दूरवरच्या खेड्यापाड्यातून लाऊडस्पीकरवरुन हमखास सुपर हिट होणार हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरजच नव्हती. हे गाणे पडद्यावर साकारायला अदाकारा तशी विशेषच हवी.
रेखाने आपल्या अनेक चित्रपटांतील चित्रीकरणाच्या तारखांतून एक तारीख सुषमा शिरोमणीला द्यावी ही एक ब्रेकिंग न्यूजच. रेखाच्या एकेका तारखेला भावी किंमत असल्याचे ते दिवस. ती तारीख मिळाली आणि परेल येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओत दिग्दर्शक टी.के. देसाई यांनी सेट लावला. शूटिंगचे ठरले आणि अचानक त्या दिवशीच काही कारणास्तव महाराष्ट्र बंद घोषित करण्यात आला. रेखाची एकेक तारीख महत्वाची असतानाच ही तारीख फुकट वा वाया जाण्याची भीती. आता करायचे काय? सहजी हार मानेल ती सुषमा शिरोमणी कसली? तिने आपले कॅमेरामन नरोत्तम पटणी आणि आवश्यक तेवढे युनिट आदल्याच दिवशी स्टुडिओत बोलावून रहायची व्यवस्था केली. रेखाचे वांद्र्यातील सी वूड येथील निवासस्थान येथून राजकमल कलामंदिर स्टुडिओत कोणत्याही परिस्थितीत सेटवर यायचेच ठरवले. त्यासाठी ती चक्क आदल्या रात्री जाऊन स्टुडिओत राहिली.
नृत्य दिग्दर्शक कमल व माधव किशन यांनी लावणीचा ठेचा पटकन पकडला. रेखाने स्टेप्स लवकर आत्मसात केल्या. गुणवान कलाकाराचे हे वैशिष्ट्यच असते. गाण्यात सुरुवातीलाच एका प्रेक्षकाकडून आलेल्या शिट्टीला तसेच कडक प्रत्युत्तर दिले. एका दिवसात कुठं कुठं गाण्याचे फर्मास चित्रीकरण झाले. फटाकडी मसालेदार मनोरंजक चित्रपट. फर्स्ट शोपासूनच सुपर हिट. आणि त्यात रेखाच्या नृत्याचा तडका. शहरातील रेडिओवर तर गावागावांतील यात्रेत, जत्रेत कुठेही गेलो तरी लाऊडस्पीकरवर आहो भरल्या बाजारी धनी मला तुम्ही हेरलं हा तडका कायम. रेखाच्या कानावर या आपणच धमाकेदार नृत्य केलेल्या या भन्नाट गाण्याची लोकप्रियता पोहचली नसती तर नवलच होते. आपणच नृत्य केलेले गाणे आपणच पहावे असे तिने सुषमा शिरोमणीला सांगितले. रेखा अंधेरीतील आंबोली येथील फिल्मालय स्टुडिओत एका हिंदी चित्रपटाचे शुटिंग करीत असताना तेथील मिनी थिएटरमध्ये खास रेखासाठी या गाण्यापुरते स्क्रीनिंग ठेवले.
तोपर्यंत आयटेम साँग हा शब्दप्रयोग प्रचलित झाला नव्हता. हे मराठीतील पहिले आयटेम साँग म्हणून ओळखले जातेय हे यश केवढे तरी. काही कलाकारांची एकत्र काम करता करता सहकलाकारांशीही जोडी जमते आणि काही सकारात्मक गोष्टी घडतात. जयश्री गडकर व शांता तांबे या जोडीबद्दल असेच घडले. जयश्री गडकर मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय नामवंत अभिनेत्री तर शांता तांबे यांनी अनेक चित्रपटांतून लहान मोठ्या भूमिका साकारत आपला ठसा उमटवला. विशेष उल्लेखनीय गोष्ट, अनेक चित्रपटांत शांता तांबे या जयश्री गडकर यांच्या सासूच्या भूमिकेत असत.
अनंत माने दिग्दर्शित मानिनी या चित्रपटात या दोघींनी प्रथमच एकत्र काम केले. जयश्री गडकर या आघाडीवरील नायिका होत्या. याचा काहीसा दबाव शांता तांबे यांच्यावर होता. हे जयश्री गडकर यांच्या लक्षात आले. त्या शांता तांबे यांना म्हणाल्या, तू काही काळजी करु नकोस. तू नाटकात एवढं चांगले काम करतेस. भितेस कशाला? तू छान काम करशील याची खात्री आहे. तेव्हापासून त्यांची रुपेरी पडद्यावरील जोडी जमली. अनेक चित्रपटात सासू व सून असे त्यांचे नाते असतानाच कधी त्यांच्या वाड्यातील मोलकरीण, कधी त्या जयश्री गडकर यांच्यावर प्रेम करत. तर कधी रागवतही. प्रत्येक चित्रपटाच्या वेळेस जयश्रीबाई भेटल्यावर म्हणायच्या काय, आज मला किती शिव्या देणार? काय माया वगैरे करणारेस का? प्रेमबिम करणार आहेस का माझ्यावर? यावर शांता तांबे जयश्रीबाईना म्हणत, चित्रपटांत मी तुमच्यावर रागावत असले तरी एरवी माझं तुमच्यावर अतिशय प्रेम आहे. दत्ता धर्माधिकारी दिग्दर्शित थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटातील एका दृश्याच्या चित्रीकरणाच्या वेळची गोष्ट. एका दृश्यात जयश्री गडकर व शांता तांबे यांच्यातील संवाद चित्रीत करण्यात येत होता. एकादा कलाकार असता तर अशा वेळी आपलेच अधिकाधिक क्लोजअप पडद्यावर दिसतील याची काळजी घेतली असती, सहकलाकाराला पाठमोरे ठेवले असते आणि सहकलाकाराचे संवाद असतानाही आपणही त्या फ्रेममध्ये दिसू याची खास काळजी घेतली असती, पण जयश्री गडकर यांनी तसे अजिबात केले नाही. त्यांनी आपल्या संवादाच्या वेळेस शांता तांबे यांना आपल्यासोबत फ्रेममध्ये ठेवले आणि शांता तांबे यांच्या संवादाच्या वेळेस त्यांना क्लोजअपची संधी दिली. आपणही दुसर्‍याच्या कामाची कदर ठेवली तरच त्या कलाकारासोबत आपली जोडी जमते हेच यातून अधोरेखित होत आहे. खास महिला दिनानिमित्त मराठी चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध नायिकाचे हे किस्से. दिलीप ठाकूर- चित्रपट समीक्षक

Check Also

पीएचडी संशोधकांच्या फेलोशिप विलंबाचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून विधीमंडळात प्रश्न

मुंबई ः रामप्रहर वृत्तदलित-बहुजन समाजातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात …

Leave a Reply