बीड ः प्रतिनिधी
दिवाळीसाठी पुण्याहून गावी परतणार्या तरुणीवर अॅसिड हल्ला करून नंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना बीडमधील येळंबघाट येथे घडली. गंभीररित्या भाजलेल्या तरुणीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी (दि. 15) पहाटे तिचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणातील आरोपी व मयत तरुणी दोघे पुण्यात एकत्र (लिव्ह इन रिलेशनशिप) राहत होते अशी माहिती समोर आली आहे. बीड तालुक्यातील येळंबघाट येथे शनिवारी रस्त्यालगत 22 वर्षीय तरुणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती. शेळगाव (ता. देगलूर जि. नांदेड) येथील ही तरुणी गावातीलच एका तरुणासोबत पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. शुक्रवारी रात्री दोघेही गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पहाटे तीनच्या सुमारास मांजरसुंबा-केज मुख्य रस्त्यावरून जात असताना तरुणाने दुचाकी थांबवली आणि तरुणीला रस्त्याच्या कडेला घेऊन तिच्यावर अॅसिड टाकले व त्यानंतर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. तरुणीला पेटवून दिल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. अॅसिड हल्ला आणि पेट्रोलने तरुणीचे 48 टक्के शरीर भाजले होते. अर्धवट भाजलेल्या अवस्थेत तरुणी रस्त्यालगत तब्बल 12 तास पडून होती. काही वाहनधारकांना आवाज आल्याने त्यांनी खड्ड्यात पहिले असता, अर्धवट जळालेल्या अवस्थेतील तरुणी दिसल्याने पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून, अविनाश राजुरे या तरुणाविरुद्ध नेकनूर (ता. बीड) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
एका तरुणीला अॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळले गेले, 12 तास ती रस्त्यावर तशीच पडून होती आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. राज्यात सातत्याने महिला अत्याचारात वाढ होते आहे. राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करावी.
-देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते