माणगाव ः प्रतिनिधी
माणगाव नगरपंचायतीच्या 2021मध्ये होणार्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगरसेवकपदाची आरक्षण सोडत शुक्रवारी (दि. 27) सकाळी 11 वाजता मध्यवर्ती प्रशासकीय भवन तहसील कार्यालय माणगाव येथील सभागृहात तालुक्याच्या प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे. माणगावकरांना त्याची उत्सुकता लागली आहे.
माणगाव नगरपंचायतीची मागील निवडणूक 10 जानेवारी 2016 रोजी झाली. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकून सत्ता प्रस्थापित केली. मागील निवडणुकीचा विचार करता येणार्या माणगाव नगर पंचायत निवडणुकीसाठी सर्व वॉर्डांतून विविध पक्षांचे अनेक कार्यकर्ते उमेदवारी करण्यास इच्छुक असून या सर्वांच्या नजरा आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत.
माणगाव नगरपंचायतीची 2020ची झालेली सार्वत्रिक निवडणूक पाहता 2021ची निवडणूक कोणत्या पद्धतीने लढवली जाईल याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय व मित्रपक्ष अशी महाविकास आघाडी तयार करण्यात आली आहे. ही आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राहील की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बहुतांशी गावांतून आघाडी झाली नसल्याचेच दिसून आले आहे. त्यातच माणगाव नगरपंचायत निवडणुकीत मागच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी पक्षात कांटे की टक्कर झाली होती. माणगावात नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस विरोधातच विरोधी पक्ष लढले आहेत.
त्यामुळे या वेळीही तीच परिस्थिती कायम राहील असे दिसते. माणगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वच वॉर्डांतून सर्वच पक्षांचे कार्यकर्ते उमेदवारीस इच्छुक असून शुक्रवारच्या आरक्षण सोडतीनंतरच खर्या अर्थाने इच्छुकांची नावे पुढे येणार आहेत. काही इच्छुक उमेदवारांनी मागील तीन महिन्यांपासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असून माणगाव नगरपंचायतीवर या वेळी कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता सर्वांना लागून आहे.