Breaking News

सिंहावलोकन रायगड (कुलाबा) मतदारसंघाचे

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, रोहा, कर्जत, श्रीवर्धन हे पाच विधानसभा मतदारसंघ असलेला पूर्वीचा कुलाबा-3 (रायगड) हा लोकसभा मतदारसंघ आतापर्यंत झालेल्या लढतीमध्ये पहिल्या लोकसभेपासून सक्रीय असलेले बॅ. अंतुले आज मरणोपरांतही 17व्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रभावी असल्याचे दिसून येत आहे. 17व्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या साथीला चक्क बॅ. अंतुले यांचे चिरंजीव नाविद अंतुले हे शिवसेनेमध्ये सहभागी झाल्याचे दिसून येत आहेत.

रायगड जिल्हा आणि बॅ. ए. आर अंतुले यांचे नाव पहिल्या 1952च्या लोकसभा निवडणुकीपासूनच एकमेकांशी संबंधित राहिलेले आहे. त्या वेळी बॅ. अंतुले हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले युवा सुशिक्षित तरुण होते. शेतकरी कामगार पक्षाचे राजाराम बाळकृष्ण राऊत यांच्याविरुद्ध चिंतामणराव द्वा. देशमुख हे काँग्रेसतर्फे उमेदवार होते. बॅ. अंतुले यांनी काही भागांत सामान्य कार्यकर्ता म्हणून सी. डी. देशमुखांचा प्रचार करून त्यांच्या विजयाला हातभार लावला. त्या काळी बॅ. अंतुले यांची काँग्रेस पक्षामध्येक्रियाशील कार्यकर्ता म्हणून मान्यता वाढीस लागत होती. सी. डी. यांच्या महाराष्ट्राभिमानासाठीच्या त्यागाचे मोल या काळात त्यांनी अर्थमंत्रीपदाचा त्याग केल्याने विशेष चर्चेत राहिले, मात्र त्यानंतरच्या 1957 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे दत्तात्रेय काशीनाथ कुंटे हे शेकापच्या राजाराम राऊत यांच्याकडून पराभूत झाले. मागील निवडणुकीत पराभूत तो पक्ष येणार्‍या निवडणुकीत विजयी असे चित्र कुलाबा-3च्या मतदारांनी अवलंबिले. यानुसार 1962 मध्ये काँग्रेसचे भास्कर दिघे यांचा विजय झाला, तर शेकापचे राजाराम राऊत पराभूत झाले. या वेळी प्रजा समाजवादी पक्षाचे लीलाधर केणी आणि जनसंघाचे प्रभाकर पटवर्धन या उमेदवारांमध्ये विरोधी मते विभागली गेली. 1967 मध्ये काँग्रेसचे 1957चे पराभूत लोकसभा उमेदवार दत्तात्रेय कुंटे यांनी शेकापमधून उमेदवारी लढवित काँग्रेसचे वसंत रणदिवे यांना पराभूत केले. प्रत्येक वेळी बॅ. अंतुले यांची जनसामान्यांवरील पकड दिसून आली. 1971मध्ये महाडचे शंकरराव तथा दादासाहेब सावंत यांना नको असलेली लोकसभेची उमेदवारी विजयाच्या खात्रीसह बॅ. अंतुले यांनी घेण्यास भाग पाडले आणि शेकापचे अ‍ॅड. दत्ता पाटील, भारतीय क्रांतिदलाचे दत्तात्रेय कुंटे आणि अपक्ष बॅ. ए. टी. पाटील यांचा या निवडणुकीत पराभव करीत शं. बा. तथा दादासाहेब सावंत यांना विजयी केले. 1977 मध्ये हे चित्र बदलण्याचा या कुलाबा-3 लोकसभा मतदारसंघाचा प्रघात कायम राहिला आणि शं. बा. सावंत यांना पराभूत करून शेकापचे दि. बा. पाटील खासदार होऊन दिल्लीत गेले. 1980 मध्ये कुलाबा-3 मध्ये नावारूपास आलेल्या जनता पक्षाचे उमेदवार अ‍ॅड. दत्ता खानविलकर आणि शेकापचे दि. बा. पाटील यांना पराभूत करून काँग्रेसचे उमेदवार बॅ. ए. टी. पाटील हे विजयी झाले. दि. बा. पाटील यांना 1984 मध्ये सलग दुसर्‍यांदा लोकसभेवर जाण्याची संधी मिळाली ती काँग्रेस पक्षात झालेल्या बंडाळीमुळे बॅ. अंतुले यांनी अपक्ष उमेदवारी करीत काँग्रेसचे बॅ. ए. टी. पाटील यांच्यासमोर आव्हान उभे केले आणि दि. बा. पाटील यांनाच त्याचा लाभ झाला. येथे पहिल्याच लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करणार्‍या बॅ. ए. आर अंतुले यांना मतदारांची नाडी समजून आली. तेथून 1989च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शेकापचे दि. बा. पाटील, भाजपचे नरेन जाधव, बहुजन समाज पार्टीचे आनंद रामटेके यांना पराभूत करून बॅ. अंतुले लोकसभेवर 39 हजार 706 मताधिक्याने पहिल्यांदा निवडून गेले.

कुलाबा-3 लोकसभा मतदारसंघातील परिवर्तनाच्या आट्यापाट्यांवर खेळ दि. बा. पाटील यांनी दोन वेळा खासदार होऊन काहीसा थांबविला, परंतु बॅ. अंतुले यांचा जिल्ह्यातील मतदारांचा राजकीय अभ्यास त्यांच्या यशाचे गमक ठरू लागले. 1991 मध्ये बॅ. ए. आर. अंतुले यांच्यासमोर शिवसेनेचे सतीश प्रधान, शेकापचे अ‍ॅड. दत्ता पाटील यांच्यासह 11 उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले. या सर्वांचा पराभव करीत बॅ. अंतुले यांनी दि. बा. पाटील यांच्याप्रमाणेच दुसर्‍यांदा लोकसभेवर सलग निवडून जाण्याचा मान मिळविला, तर भाजपच्या नरेन जाधवांप्रमाणेच शिवसेनेचे सतीश प्रधान यांचाही पराभव झाला.  1996मध्ये शिवसेनेचे ठाण्याचे विक्रमादित्य महापौर अनंत तरे यांच्या उमेदवारीने शिवसेनेने पुन्हा खेळी केली, मात्र बॅ. ए. आर. अंतुले यांनी त्यांच्यासह शेकापचे दत्ता पाटील, तसेच अन्य 12 उमेदवारांनाही पराभूत करून विजयाची हॅटट्रिक साधली. या वेळी बॅ. अंतुले यांच्यावर तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव सरकारमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनतर्फे तब्बल साडतीन हजार कोटी रुपयांची मदत देऊन शिवशाही सरकारचे आपण केंद्र सरकारमधील राजदूत आहोत, या गर्जनेमुळेच.

यानंतरही शिवसेनेने कुलाबा लोकसभा मतदारसंघात 1998 मध्ये बॅ. अंतुले यांच्यासमोर अनंत तरे यांना दुसर्‍यांदा उमेदवारी दिली. शेकापने मात्र रामशेठ ठाकूर यांना रिंगणात आणून बॅ. अंतुले यांच्यासमोर आव्हान उभे केले. मतमोजणीच्या शेवटच्या काही फेर्‍या बाकी असताना मतांची आघाडी पाहून बॅ. अंतुले यांनी विजयी झाल्याच्या खात्रीने दिल्लीला शरद पवार यांच्यासमवेत प्रयाण केले आणि दिल्लीच्या भूमीवर पाऊल पडण्यापूर्वीच ते शेकापचे उमेदवार रामशेठ ठाकूर यांच्याकडून 9 हजार 126 मतांनी पराभूत झाल्याचे वृत्त थडकले. यापुढील 1999च्या मध्यावधी निवडणुकीमध्ये बॅ. अंतुले यांनी कुलाबा 3 ऐवजी औरंगाबाद येथून लोकसभा निवडणूक लढवली, पण त्यामुळे शेकापचे रामशेठ ठाकूर यांच्यासमोर काँग्रेसच्या नवख्या उमेदवार पुष्पा साबळे यांची उमेदवारी खूपच केविलवाणी ठरली, तर शेकापकडून दोन वेळा खासदारकी मिळविलेले दि. बा. पाटील यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी केली. शिवसेना चौथ्या वेळा पराभूत झाली आणि रामशेठ ठाकूर दुसर्‍यांदा खासदार झाले.

2004मध्ये बॅ. ए. आर. अंतुले यांचे कुलाबा -3 लोकसभा मतदारसंघामध्ये राजकीय पुनरागमन झाले. या वेळी बॅ. अंतुले यांच्यासोबत त्यांचे प्रतिस्पर्धी शेकापचे अ‍ॅड. दत्ता पाटील आणि दि. बा. पाटील हे प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह उतरले. शेकापचे विवेक पाटील आणि शिवसेनेचे श्याम सावंत यांचा बॅ. अंतुले यांनी पराभव करून चौथ्यांदा लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळविले.

बॅ. अंतुले हे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री म्हणून कार्यरत असताना 2009 मध्ये त्यांनी काँग्रेसतर्फे नव्याने पुनर्रचना झालेल्या रायगड-32 लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या पोषक वातावरण नव्हते. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आक्रमक असताना काँग्रेससमोर राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीतील दुफळी आणि पारंपरिक शेकापचा उमेदवार नसल्याने शिवसेनेचे चार वेळा खासदार झालेले माजी ऊर्जामंत्री अनंत गीते यांचे शेकाप-शिवसेना-भाजप महायुतीचे आव्हान उभे होते.

1996-1998 पासून खा. अनंत गीते यांनी सलग 1998-1999, 1999-2004 आणि 2004-2009 अशी चार वेळा खासदारकी मिळवून नव्याने पुनर्रचना झालेल्या रायगड लोकसभेची पाचव्यांदा उमेदवारी मिळविली आणि विजयीदेखील झाले. रायगड लोकसभा मतदारसंघातील 16व्या लोकसभा निवडणुकीमध्ये खा. गीते यांना तीन लाख 96 हजार 178 मते मिळाली, तर ना. तटकरे यांना तीन लाख 94 हजार 68 मते मिळाली आणि खा. गीते केवळ दोन हजार 110 मतांनी विजयी झाले. तिसर्‍या स्थानावर एक लाख 29 हजार 730 मते मिळवित शेकापचे रमेश कदम राहिले. आताच 17व्या लोकसभे वेळी रायगड लोकसभा मतदारसंघातील हॅटट्रिक साधण्याचा प्रयत्न करण्यास उत्सुक असलेल्या केंद्रीय अवजड उद्योगमंत्री ना. अनंत गीते यांनी चक्क बॅ. अंतुले यांचा मुलगा नाविद याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना प्रवेश देऊन अंतुले यांचे राजकीय वारसदार असलेल्या मुश्ताक अंतुले यांची आठवण काढण्यास भाग पाडले आहे.

-शैलेश पालकर, खबरबात

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply