कर्जत : बातमीदार
निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या माथेरान या पर्यटनस्थळी प्रत्येक ऋतूत निसर्ग आपली किमया दाखवत आहे. त्यात शिशिर ऋतूमध्ये पानगळती होऊन वसंत ऋतूमध्ये नवीन पालवी फुटून निसर्गाचे नवीन रूप येथे आलेल्या पर्यटकांना अनुभवण्यास मिळणार आहे.
माथेरान हे निसर्गाने नटलेलं पर्यटनस्थळ असून, निसर्गाची वेगवेगळी रूपे इथे पाहवायस मिळतात. त्यापैकी वसंत ऋतूत झाडाला येणारी नवीन पालवी ही पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.पानगळती झालेल्या पालापाचोळ्यातून चालताना कडक पाला तुटण्याच्या होणार्या आवाजाने पर्यटक आनंदी होतात.तर करंज, आंबा, कोलारा या झाडांना आलेल्या नवीन पालवीवर सूर्यकिरण पडल्यावर ती पालवी चमकताना दिसते, हे सारे पर्यटकांना आकर्षित करत आहे. वसंत ऋतू पक्षांसाठी खूप महत्वाचा आहे.हा महिना पक्षांच्या मनोमिलनाचा असतो. त्यामुळे येथील निसर्गात सकाळपासून बुलबुल, चिमणी, कुटरुक आणि स्वर्गीय नर्तक या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकावयास मिळत आहे. हे चित्र कोणत्याही शहरामध्ये पाहवयास मिळत नाही, ते फक्त माथेरानमध्ये दिसते. यामुळे निसर्गप्रेमी पर्यटक या महिन्यातच माथेरानला भेट देतात.
माथेरानचा निसर्ग आम्हांला भुरळ घालणारा आहे. पानगळती अन झाडाला येणारी नवीन पालवी, हे याच महिन्यात पाहवयास मिळते. तसेच पक्षीसुद्धा आवाज देऊन एकमेकांना संपर्क करत असतात, हे दृश्य अतिशय विलोभनीय असते. हा मोसम पाहण्यासाठी आम्ही परिवारासह माथेरानला पाच वेळा आलो आहोत.
-नितीन रनखांबे, पर्यटक, मुंबई
मार्च महिन्यात निसर्गाचे वेगळे रूप दिसते, कारण शिशिर ऋतूमध्ये झाडांची पानगळती मोठ्या प्रमाणात होते व झाडाला नवीन पालवीचा बहर येतो. पक्षीसुद्धा आवाजाने एकमेकांच्या संपर्कात येतात. यामुळे माथेरानच्या पर्यटनाला मार्च महिन्याचे खूप महत्व आहे. या महिन्याचे महत्व नगरपालिकेने माहिती केंद्राद्वारे सांगावे, जेणेकरून पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल.
-पवन गडवीर, अध्यक्ष, निसर्ग मित्र संस्था, माथेरान