कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार
तालुक्यातील अतिदुर्गम भागात जांबरुंग येेथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत स्वच्छतागृहाची समस्या भेडसावत होती. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत विजयभूमी विद्यापीठ हे एक शैक्षणिक संकुल आकार घेत आहे. या संस्थेने जांबरुंग प्राथमिक शाळेला मुलींसाठी दोन स्वच्छतागृहे उभारून देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
शासनामार्फत प्राथमिक शाळेच्या इमारती उभारल्या जातात, परंतु विद्युत पुरवठा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे या महत्त्वाच्या गरजांसाठी शासकीय निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते. स्वच्छतागृह नसल्याने विशेषत: विद्यार्थिनी व शिक्षिकांची गैरसोय होते. जांबरुंग प्राथमिक शाळेत स्वच्छतागृह नसल्याचे विजयभूमी विद्यापीठाचे कुलगुरू संजय पडोडे यांच्या लक्षात आले. त्यांनी शाळेलगत दोन सुसज्ज महिला स्वच्छतागृहे बांधली. त्याचा लोकार्पण सोहळा संस्थेच्या सदस्य कल्पना पडोडे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ग्रामपंचायत सरपंच दत्तात्रेय पिंपरकर तसेच ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. लॉकडाऊनच्या काळातही धान्य वाटप करून विजयभूमी विद्यापीठाने सामाजिक बांधिलकी जपली होती.