नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कोकणातील हापूस आंब्याचे यंदा उत्पादन घटले असून घाऊक बाजारात हापूस आंब्याला उठाव राहिलेला नाही. त्यामुळे विक्रीचे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणार्या व्यापार्यांच्या नवीन पिढीने देवगडच्या हापूस आंब्याची विक्री सुरू केली आहे. त्याला हळूहळू प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी हापूस आंबा बागायतदार व व्यापार्यांनी हा प्रयत्न केला नव्हता. पणन व्यवसायात कार्यरत असलेल्या कंपन्यांनी ही विक्री सुरू केली आहे, पण व्यापार्यांची दुसरी पिढी या व्यवसायात ऑनलाइन उतरली आहे.
कोकणातील हापूस आंब्याची आवक जानेवारी महिन्यापासून सुरू झाली आहे. ही आवक एप्रिल महिन्यात सर्वसाधारणपणे वाढत असल्याचा अनुभव आहे. गुढीपाडव्याला तर या हापूस आंब्याची विधिवत पूजा करून तो बाजारात विकला जातो, मात्र अलीकडे स्पर्धा वाढल्याने हापूस आंबा लवकर बाजारात पाठविण्याची अहमहमिका वाढली आहे. यंदा कोकणात हापूस आंब्याचा मोसम अर्ध्यावर आला असून गेल्या वर्षी या महिन्यात बाजारात आलेल्या 50 हजार पेट्यांऐवजी यंदा केवळ 25 हजार पेट्या हापूस आला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे हापूस आंब्याला म्हणावा तसा उठाव नाही. त्यामुळे हापूस आंब्याच्या विक्रीचे नवीन तंत्रज्ञान व्यापार्यांची नवीन पिढी अवलंबत आहे. एपीएमसीचे माजी संचालक संजय पानसरे यांच्या मुलाने ‘बुक माय शो’च्या धर्तीवर ‘बुक माय मँगो’ नावाची साइट तयार केली असून या संकेतस्थळावरून ही विक्री केली जात आहे. संकेतस्थळावर आरक्षित करणारे आंबे ग्राहकाला घरपोच पोहचविले जात आहेत. ऑनलाइन मिळणार्या या हापूस आंब्याची पेटी अर्धा डझनची तयार केली जात आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन पिढीने हापूस आंबा विक्रीचे हे नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले आहे.